5 वर्षात सीमेबाहेर 3 वेळा वायुसेनेची यशस्वी कामगिरी, पाकिस्तान मध्ये खळबळ - राजनाथ सिंह

तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh)यांनी शनिवारी (9 मार्च) एक मोठा खुलासा केला आहे.

गृहमंत्री राजनाथ सिंह (फोटो सौजन्य-ट्वीटर)

मोदी सरकारचा कार्यकाळ अवघ्या दोन महिन्यात संपणार आहे. तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह  (Rajnath Singh)यांनी शनिवारी (9 मार्च) एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, मोदी सरकारच्या सत्तेमध्ये आतापर्यंत 3 वेळा सीमेबाहेर भारतीय वायुसेने यशस्वी कामगिरी करत दुश्मनांना धडा शिकवला आहे.

मंगळरु येथील एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी असे म्हटले की, गेल्या पाच वर्षात 3 वेळा आपल्या भारताची सीमा ओलांडून एअर स्ट्राईक यशस्वी पद्धतीने करण्यात आले. या तीन एअर स्ट्राईक मधीन दोन हल्ल्यांची माहिती दिली जाईल. मात्र तिसऱ्या एअर स्ट्राईकची माहिती देऊ शकत नाही.(हेही वाचा-राजस्थान : श्री गंगानगर सेक्टर परिसरात पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात भारतीय आर्मीला यश, एअर स्ट्राईक नंतर आज तिसरं ड्रोन)

सिंह यांनी असे म्हटले की, पहिल्यांदा जेव्हा आपली भारतीय जवान झोपले असताना त्याचवेळी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. त्यानंतर जे काही झाले त्याबद्दल तुम्हाला माहितीच आहे. तर दुसरा एअर स्ट्राईक हा पुलवामा भ्याड हल्ल्यानंतर करण्यात आले. परंतु तिसऱ्या एअर स्ट्राईकची मी माहिती देऊ शकत नाही असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

दरम्यान पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान मधील बालकोट येथे भारतीय वायुसेनेकडून हल्ला करण्यात आला. त्यामध्ये 300 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला असल्याचा दावा केला जात आहे. मात्र मोदी सरकारकडून या संख्येचा आकडा निश्चित करण्यात आलेला नाही.

भारतात पुलवामा हल्ल्यापूर्वी 18 सप्टेंबर 2016 मध्ये उरी येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी दहशतवाद्यांनी भारतीय लष्काराच्या प्रशिक्षण स्थळांवर निशाणा साधून 20 जवानांची हत्या केली होती. त्यानंतर या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी जवानांनी हल्ल्याच्या अवघ्या 10 दिवसानंतर पाकव्याप्त काश्मिर मध्ये घुसुन हल्ला करत सर्जिकल स्ट्राईक करुन प्रतिउत्तर दिले होते.