Rajkot: आता रुग्णालयातील बेडचेही व्यवहार; खास एजंटद्वारे 9 हजारांमध्ये होत आहे डील, जाणून घ्या सविस्तर
ज्या व्यक्तीसोबत त्याचे बोलणे चालू आहे त्या व्यक्तीने रक्कम कमी केली आहे. त्यांच्या संभाषणादरम्यान, सोलंकीला अजून एक फोन येतो आणि समोरील व्यक्तीला तो म्हणतो की, ‘9,000 हजार रुपयांपेक्षा कमी पैसे घेणार नाही.
'मी 9000 रुपयांपेक्षा एक पैसा कमी घेणार नाही. मलाही रुग्णालयातील लोकांना पैसे द्यावे लागतात. पैसे द्या, तुम्हाला 30 मिनिटांत बेड मिळवून देतो.' राजकोटमधील सिव्हिल हॉस्पिटल (Rajkot Civil Hospital) बाहेर एजंट आणि कोरोना रुग्णांच्या नातेवाईकामध्ये झालेल्या संभाषणाचा हा एक भाग आहे. ज्याठिकाणी कोरोना विषाणूच्या रूग्णांना बेड मिळत नाहीत. तासनतास प्रतीक्षा करूनही बेड उपलब्ध होत नाहीत, ऑक्सिजनची कमतरता आहे, उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावत आहेत तिथे एजंट चक्क पैसे घेऊन बेड विकत आहेत. बुधवारी, बॅकडोअर एन्ट्रीला होत असलेल्या या डीलचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
व्हिडीओ समोर आल्यानंतर क्राइम ब्रांच (DCB) आणि प्रद्युमनगर पोलिस स्टेशनची टीम सक्रिय झाली. त्यानंतर त्यांनी रात्री उशिरा जगदीश सोलंकी (वय 20) आणि हितेश महिडा (वय 18) या दोघांना ताब्यात घेतले. सोलंकी रूग्णालयात परिचर म्हणून काम करतो, हितेश सफाई कर्मचारी आहे. दोघेही जामनगरचे रहिवासी आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कारच्या मागील सीटवर बसलेला सोलंकी बेडसाठी 9,000 रुपये मागत आहे. ज्या व्यक्तीसोबत त्याचे बोलणे चालू आहे त्या व्यक्तीने रक्कम कमी केली आहे. त्यांच्या संभाषणादरम्यान, सोलंकीला अजून एक फोन येतो आणि समोरील व्यक्तीला तो म्हणतो की, ‘9,000 हजार रुपयांपेक्षा कमी पैसे घेणार नाही. तुमच्याकडे पैसे असल्यास चौधरी शाळेजवळ तुमच्या गाडीने या आणि मला कॉल करा.’ शेवटी गाडीत बसलेल्या व्यक्तीशी 8000 रुपयांना डील फायनल होते. (हेही वाचा: भारतामध्ये पहिल्यांदाच कोरोनाबाधितांचा 24 तासांतील आकडा 3 लाखांच्याही पार; दिवसभरात 3,14,835 नवे रूग्ण समोर 2,104 मृत्यू)
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक व्ही.के. गढवी म्हणाले, ‘यंत्रणेतील त्रुटीमुळे या लोकांनी पैसे घेऊन बेड पुरवणे सुरु केले.’ एफआयआर नोंदवून त्यांच्याविरूद्ध पुरावे गोळा केले जात आहेत. अटक केलेल्या दोन्ही आरोपींचे म्हणणे आहे की त्यांनी फक्त एकाच रुग्णाकडून पैसे घेऊन बेड दिला होता आणि त्याचाच व्हिडीओ व्हायरल झाला. अशाप्रकारे सध्याच्या परिस्थितीमध्ये रुग्णांच्या असहाय्यतेचा फायदा घेत पैसे उकळण्याचे काम सुरु आहे.