ऑटिझम असलेल्या मुलासाठी महिलेने मागितली पीएम नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत; रेल्वेने राजस्थानहून मुंबईला पाठवले 20 लिटर उंटाचे दुध
अशात रेल्वे आपल्या पार्सल ट्रेन सेवेद्वारे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजा नियमितपणे विविध राज्ये व शहरांमध्ये पोहोचवित आहे.
सध्याच्या लॉक डाऊनच्या (Lockdown) काळात नागरिकांना काही गोष्टींच्या कमतरतेमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशात रेल्वे (Indian Railway) आपल्या पार्सल ट्रेन सेवेद्वारे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजा नियमितपणे विविध राज्ये व शहरांमध्ये पोहोचवित आहे. शनिवारी रेल्वेने अशीच एका आईची मागणी पूर्ण केली व या बाबतची रेल्वेची कामगिरी पाहून माणुसकीवरचा विश्वास आणि सरकारची कामाची तत्परता दिसून येते. मुंबईतील एका महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर आपली मागणी मांडली. आपला ऑटिझम ग्रस्त मुलाला जगण्यासाठी डाळी आणि उंटांच्या दुधाची गरज होती, याच बाबत ही मागणी होती.
उत्तर-पश्चिम रेल्वेचे मुख्य पॅसेंजर ट्रान्सपोर्ट मॅनेजर तरुण जैन, अभय शर्मा, यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील एका महिलेने ट्विटरवर पंतप्रधानांना अपील केले होती की, तिच्या मुलाला ऑटिझम आहे व तो फक्त उंटाचे दूध आणि डाळीवरच जगू शकतो. आपल्या ट्वीटमध्ये ही महिला म्हणते, ‘जेव्हा लॉक डाउन सुरू झाले तेव्हा माझ्याकडे पुरेसे उंटांचे दूध नव्हते. आता अवघे 3 ते 4 दिवस पुरेल इतकेच दुध माझ्याकडे आहे. कृपया मला सादडी (राजस्थान) येथून उंटाचे दूध किंवा पावडर पुरवण्यास मदत करा.’ ओडिशा केंद्रीय विद्युत पुरवठा यूटिलिटीचे सीआयओ आणि आयपीएस अरुण बोथरा यांच्या जवळच्या एका व्यक्तीने त्यांना ही माहिती दिली. हे आयपीएस अधिकारी मूळचे राजस्थानचे असल्याने ते मदत करू शकतील असा विश्वास त्या व्यक्तीला होता.
त्यानंतर बोथरा यांनी या महिलेला कसे तरी पुढच्या काही दिवसांसाठी 400 ग्राम दुध पावडरची व्यवस्था मुंबईमध्येच करून दिली. त्यानंतर रेल्वेने पुढच्या दुधाची व्यवस्था करण्यास सुरुवात केली. चौकशी केल्यावर रेल्वेला कळले की अजमेर येथून उंटांचे दूध मिळू शकते. अशा परिस्थितीत उत्तर पश्चिम रेल्वेने आपल्या झोनमध्ये येणाऱ्या अजमेरच्या विक्रेत्याशी चर्चा केली. विक्रेत्याने अजमेरपासून 235 कि.मी. अंतरावर राजस्थानातील फालना स्टेशनवर ते आणण्याची व्यवस्था केली. फालना स्टेशन राजस्थानच्या पाली शहरात आहे. (हेही वाचा: Swiggy भारतातील 125 शहरांमध्ये घरपोच देणार किराणामालाची सुविधा)
इथे थांबा नसूनही रेल्वेने फालना स्टेशनवर, लुधियाना ते वांद्रे टर्मिनसकडे जाणारी पार्सल ट्रेन थांबविली, पार्सल कार्यालय सुरू केले. इथून 20 लिटर कॅमल मिल्क आणि दुधाची पावडर मुंबईला पाठविली. सायंकाळी पाच वाजता पार्सल ट्रेन वांद्रे टर्मिनसला पोहोचली आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत फ्रोजन कॅमल मिल्क आणि उंटाच्या दुधाची पावडर रेल्वेने या महिलेच्या घरी पोहचवली.