भारताकडे राफेल विमान दसऱ्याच्या दिवशी सुपूर्द करणार, राजनाथ सिंह राहणार उपस्थित
तर येत्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर राफेल भारताकडे सुपूर्द केले जाणार आहे. यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) उपस्थित राहणार असून ते फ्रान्सला जाणार आहेत.
फ्रान्स (France) पद्धतीचे लढाऊ विमान राफेल (Rafale) लवकरच आता वायुसेनेत दाखल होण्याच्या तयारीत आहे. तर येत्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर राफेल भारताकडे सुपूर्द केले जाणार आहे. यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) उपस्थित राहणार असून ते फ्रान्सला जाणार आहेत. यापूर्वी राफेल भारताला 20 सप्टेंबर रोजी देण्यात येणार होते. मात्र आता याची तारीख पुढे ढकलली असून ते आता 8 ऑक्टोंबरला भारताकडे देणार आहेत.
राजनाथ सिंह वायुदलाच्या एका टीमसोबत 8 ऑक्टोंबरला फ्रान्सला जाणार आहेत. तर येत्या 8 ऑक्टोंबरला विजयादशमी असून राफेल विमानाची ठरवण्यात आलेली नवी तारीख ऐतिहासिक असल्याचे मानले जात आहे. दरम्यान विजयादशमीच्या दिवशी बहुतांश ठिकाणी शस्रांची पूजा केली जाते. त्यामुळे भारताला या दिवशी त्यांचे सर्वात शक्तीशाली विमान मिळणार आहे.
फ्रान्समधील बॉर्डेक्समधील एका उत्पादन कंपनीत जाणार असून तेथूनच राफेल राजनाथ सिंह यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. तसेच वायुसेनेची टीम त्यांच्यासोबत जाणार आहे. राफेल मिळाल्यानंतर वायुसेनेची टीम त्याबाबतची पुढील प्रक्रिया पूर्ण करणार आहे. त्याचसोबत वायुसेनेमधील लढाऊ वैमानिक सुद्धा उपस्थित राहणार आहेत.(राफेल विमानाची जागा घेणार Dassault Aviation चं सर्वात शक्तीशाली नवं लढाऊ विमान; Airbus सोबत करार)
राफेल डील प्रकरणी गेल्या काही वर्षांपासून सर्वत्र गदारोळ सुरु होता. 2019 मध्ये लोकसभा निवडणूकीवेळी काँग्रेस पक्षाकडून केंद्र सरकारवर याच मुद्द्यावर निशाणा साधण्यात आला होता. तसेच या डीलमध्ये घोटाळा असल्याचा ही आरोप लगावला होता.