Pune MHADA Lottery 2026: म्हाडाच्या पुणे सोडतीत उत्पन्न दाखल्याबाबत अर्जदारांना मोठा दिलासा ! दोन पैकी कोणत्याही एका वर्षाचा पुरावा ग्राह्य धरणार
पुणे म्हाडा च्या 4462 घरांच्या सोडतीसाठी अर्जदारांना आता 2024-25 किंवा 2025-26 यापैकी कोणत्याही एका आर्थिक वर्षाचा उत्पन्न दाखला किंवा आयकर विवरणपत्र सादर करता येणार आहे. आयकर विभागाच्या पडताळणीत होणारा विलंब लक्षात घेऊन म्हाडाने हा निर्णय घेतला आहे.
Income Proof Rule For MHADA Lottery: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (Pune MHADA) 4462 घरांच्या सोडतीसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना आता उत्पन्नाचा पुरावा सादर (Income Proof Rule) करताना अधिक सवलत मिळणार आहे. आर्थिक वर्ष 2024-25 किंवा 2025-26 यापैकी कोणत्याही एका वर्षाचा उत्पन्न दाखला (Income Proof) अथवा आयकर विवरणपत्र सादर (ITR) करता येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय म्हाडाने घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उत्पन्न दाखल्याबाबत निर्णय घेण्यामागचे कारण
पुणे म्हाडा सोडतीसाठी यापूर्वी केवळ आर्थिक वर्ष 2025-26 चा उत्पन्न दाखला किंवा आयकर विवरणपत्र सादर करण्याची अट होती. मात्र अर्जदारांनी सादर केलेली 2025-26 या आर्थिक वर्षाची विवरणपत्रे अलीकडीलच असल्याने आयकर विभागाकडून त्यांची ऑनलाइन पडताळणी होण्यास विलंब लागत होता. यामुळे अनेक अर्जदारांना अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन म्हाडाने दोन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षाचे उत्पन्न ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. नक्की वाचा: MHADA Pune Lottery 2026 Registration: म्हाडा पुणे लॉटरी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी; अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया .
पुणे म्हाडा घरांच्या सोडतीचे स्वरूप
म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील सदनिकांच्या वितरणासाठी 24 ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याच दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. या सोडतीत एकूण 4462 घरे उपलब्ध असून, त्यापैकी 2971 घरे 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील, तर 1491 घरे 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील आहेत.
घरांची विभागणी कुठे किती
क्षेत्रनिहाय उपलब्ध घरांची आकडेवारी पाहता, पुणे महापालिका क्षेत्रात 1468, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात 1406आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए क्षेत्रात 1588 घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नक्की वाचा: MHADA Pune Lottery 2026: म्हाडा पुणे लॉटरीत यंदा सर्वात महागडे, 65 लाखांचे घर तथवडे मध्ये; पहा त्याचे सारे अपडेट्स .
अर्ज आणि अनामत रकमेसाठी मुदत
अर्जदारांना 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. तर अनामत रक्कम ऑनलाइन पद्धतीने किंवा बँकेच्या आरटीजीएस अथवा एनईएफटी सुविधेद्वारे भरण्यासाठी 16 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
पुढील वेळापत्रक
पात्र अर्जांची प्रारूप यादी 29 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार असून, त्यावर 1 ऑक्टोबरपर्यंत दावे आणि हरकती नोंदवता येतील. त्यानंतर सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी 8 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. या संपूर्ण प्रक्रियेनंतर संगणकीय सोडतीचा अंतिम निकाल 13 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
म्हाडाने घेतलेल्या या निर्णयामुळे उत्पन्नाच्या पुराव्याअभावी अर्ज करण्यापासून वंचित राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, अधिकाधिक पात्र अर्जदारांना या सोडतीत सहभागी होता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.