देशात वाढत्या Coronavirus संसर्गाच्या पार्श्वभुमीवर PM Narendra Modi यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक; केंद्रीय टीमला महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगडला भेट देण्याच्या सूचना
या बैठकीत कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक आणि कोरोना लसीकरण मोहिमेशी संबंधित मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला
देशातील कोरोना विषाणूची (Coronavirus) वाढती प्रकरणे लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यासोबत एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक आणि कोरोना लसीकरण मोहिमेशी संबंधित मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. परिस्थितीबद्दल चर्चा करताना, पंतप्रधान मोदी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की कोरोनावर मात करण्यासाठी जनजागृती अतिशय महत्जावाची आहे. कोविड-19 व्यवस्थापनासाठी लोकसहभाग आणि जनआंदोलन सुरू ठेवण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आरोग्य सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव आणि नीती आयोगाचे डॉ. विनोद पॉल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर अंकुश ठेवण्यासाठी, पंतप्रधान मोदी यांनी अधिकाऱ्यांना 5 कलमी योजना योग्यरीतीने अंमलात आणण्याच्या सूचना केल्या. पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की, टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, कोविड नियमांचे पालन आणि लसीकरण संपूर्ण प्रामाणिकपणाने राबविले गेले तर साथीचा प्रसार थांबविण्यात यश मिळू शकेल. कोरोनापासून बचाव करण्यासाठी 6 ते 14 एप्रिल दरम्यान देशभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये 100 टक्के मास्कचा वापर, वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणी/कामाच्या ठिकाणी स्वच्छता किती महत्त्वाची आहे याबद्दल लोकांना माहिती दिली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठकीत कोविड-19 घटनांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता, केंद्रीय संघांना महाराष्ट्राचा दौरा करण्यास सांगितले आहे. कोविड-19 मुळे मोठ्या संख्येने झालेल्या मृत्यूमुळे, पंतप्रधान मोदींनी केंद्रीय संघांना पंजाब, छत्तीसगडला भेट देण्याची सूचना केली आहे. (हेही वाचा: PM Narendra Modi Election Campaign Rallies: देशात कोरोना विषाणू उद्रेक होत असताना, पीएम नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी पूर्ण केल्या 23 सभा)
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या घटना पाहता महाराष्ट्रात पूर्ण लॉकडाऊन नाही तर, शुक्रवार ते रविवार म्हणजेच वीकएंड लॉकडाऊन (Weekend Lockdown) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू असतील असेही सांगण्यात आले आहे. उद्यापासून रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू होणार आहे.