Lockdown Extended: लॉकडाउन काळात कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला 7 नियमांचा हा मास्टरप्लॅन; जाणून घ्या सविस्तर

या नियमांचे पालन केल्यास लवकरच आणि निश्चितच आपण कोरोनावर मात करू असा विश्वास सुद्धा मोदींनी व्यक्त केला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credit: IANS)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज पुन्हा एकदा देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉक डाउनच्या (Lockdown) कालावधीत 3  मे पर्यंत वाढ करण्यात येत असल्याची घोषणा मोदींनी केली.  सोबतच ज्या भागात कोरोनाचे रुग्ण नाहीत अशा भागांची तपासणी करून त्याठिकाणी 20 एप्रिल नंतर काही प्रमाणात लॉक डाऊनचे नियम शिथिल करण्यात येतील असेही मोदींनी सांगितले आहे. कोरोनामुळे वाढलेल्या लॉक डाऊन काळात नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत सांगताना मोदींनी आपला 7  नियमांचा एक मास्टर प्लॅन सांगितला आहे. या नियमांचे पालन केल्यास लवकरच आणि निश्चितच आपण कोरोनावर मात करू असा विश्वास सुद्धा मोदींनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषांतील महत्वाचे मुद्दे जाणून घ्या.

नरेंद्र मोदी यांचा 7 नियमांचा प्लॅन

1) कोरोनाचा सर्वात मोठा प्रभाव हा वयोवृद्धांवर होताना दिसत आहे, त्यामुळे प्रत्येकानी आपआपल्या घरातील वृद्धांचे अधिक काळजी घ्यावी

2) लॉक डाउनच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, घरी बनवलेले मास्क वापरावेत.

3) आयुष मंत्रालयाकडून देण्यातयेणाऱ्या आरोग्यविषयक नियमावलीचे सर्वांनी पालन करावे.

4) आरोग्य सेतू ऍप डाउनलोड करून कोरोनाशी संबंधित अधिकृत माहिती जाणून घ्यावी, अफवांवर विश्वास ठेवू नये.

5) गरीब कुटुंबांना शक्य होईल तेवढी मदत करा.

6) लॉक डाऊन काळात माणुसकी सोडू नका, कामगारांचे पगार कापून किंवा त्यांना कामावरून कमी करून संकटात आणू नका.

7) कोरोना वॉरियर्स चा सन्मान ठेवा, डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी यांचे म्हणणे ऐका.

दरम्यान, भारतात आज कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 10,363 वर जाऊन पोहोचली आहे. यात 8988 सक्रिय केसेस, 1035 डिस्चार्ज मिळालेले रुग्ण तसेच 339 मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यापुढे कोरोनात वाढ होऊ नये, नवे हॉटस्पॉट निर्माण होऊ नयेत, लोकांचे दुर्दैवी मृत्यू होऊ नयेत याची काळजी आपण प्रत्येकाने घ्यायची आहे असे आवाहन मोदींनी केले आहे.