PM Narendra Modi Addresses The Nation: 'राज्य सरकारांनी शेवटचा उपाय म्हणून Lockdown चा पर्याय निवडावा'- पंतप्रधान नरेंद्र मोदी
तसेच राज्य सरकारांनी शेवटचा उपाय म्हणून लॉकडाऊनचा पर्याय निवडावा, त्याआधी संसर्ग कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले
सध्या भारतामध्ये कोरोना विषाणूची (Coronavirus) दुसरी लाट सुरु आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे देशातील आरोग्यसेवा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक राज्यांनी निर्बंध तसेच लॉकडाऊन लादले आहेत. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज संध्याकाळी कोरोना व्हायरस परिस्थितीबाबत देशाला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, ‘सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र सरकार या विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.’ यावेळी त्यांनी देशातील डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्सचे आभार मानले. तसेच सध्या देशात ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असल्याचेही सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘संसर्ग वाढल्यानंतर देशात औषधे व आरोग्य सेवा वाढवण्यासाठी त्यांचे उत्पादन वाढवण्यात आले आहेत. देशात फार मोठे फार्मा सेक्टर आहे, जे मोठ्या प्रमाणात औषधे उत्पादित करत आहे. अनेक ठिकाणी रुग्णालयातील बेड्सची संख्या वाढवली जात आहे. अनेक शहरांमध्ये मोठ मोठी कोरोना हॉस्पीटल्स उभारली जात आहे.’ त्यानंतर त्यांनी देशातील कोरोना विषाणू लसीकरणावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘देशात मोठ्या प्रमाणात दोन कोरोना विषाणू लसींचे उत्पादन सुरु आहे. म्हणूनच सध्या भारतामध्ये जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान राबवले जात आहे.’ (हेही वाचा: आतापर्यंत कोरोना विषाणू लसीचे 44 लाख डोस गेले वाया, तामिळनाडू आघाडीवर; RTI मधून धक्कादायक बाब समोर)
ते पुढे म्हणाले, ‘देशात सध्या जे काही निर्बंध लादले गेले आहेत त्यामध्ये एका गोष्टीवर भर देण्यात आला आहे ते म्हणजे, यामध्ये आर्थिक गोष्टी प्रभावित होऊ नये. म्हणूनच देशात आता 18 वर्षे पेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील या संकटामध्ये अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. अनेक लोक जनतेला मदत करत आहेत. अशात मी देशाला आवाहन करतो की, या कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी पुढे यावे व एकमेकांना मदत करावी.’
देशात या विषाणू बद्दल असलेली भीती कमी व्हावी, अफवा-खोट्या बातम्यांवर लोकांनी विश्वास ठेऊ नये यासाठी प्रयत्न करण्याबाबतही त्यांनी भाष्य केले. तसेच राज्य सरकारांनी शेवटचा उपाय म्हणून लॉकडाऊनचा पर्याय निवडावा, त्याआधी संसर्ग कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले. कोरोनापासून वाचण्याचे जे काही उपाय आहे ते सर्व पालन करावे. लस घेल्यानंतरही काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी राम नवमी व रमजानचे उदाहरण देऊन लोकांनी या सणामधून आदर्श घ्यावे असे सांगितले. शेवटी, सध्या देशातील परिस्थिती बदलण्यासाठी सरकर सर्वोतोपरी प्रयत्न करेल, असे म्हणत त्यांनी आपले भाषण संपवले.