PM Modi | Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 15 ते 19 जून 2025 या कालावधीत सायप्रस (Cyprus), कॅनडा (Canada) आणि क्रोएशिया (Croatia) या तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते सायप्रसच्या राष्ट्रपतींसोबत द्विपक्षीय चर्चा करतील, कॅनडातील जी7 (G7) शिखर परिषदेत सहभागी होतील आणि क्रोएशियातील नेत्यांना भेटतील. हा दौरा भारताच्या भूमध्यसागरीय, उत्तर अमेरिकी आणि मध्य युरोपीय क्षेत्रांशी संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सायप्रस आणि क्रोएशिया हे युरोपीय संघाचे (EU) सदस्य असून, भारताच्या आर्थिक आणि राजकीय हितसंबंधांना चालना देण्यासाठी या भेटी रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत.

सायप्रस भेट: 15-16 जून

पंतप्रधान मोदी 15 जून रोजी सायप्रसला भेट देणार असून, ही 20 वर्षांहून अधिक काळातील भारतीय पंतप्रधानाची या देशातील पहिली भेट आहे. सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडॉलिड्स यांच्या निमंत्रणावरून होणाऱ्या या भेटीत मोदी निकोसिया येथे राष्ट्रपतींसोबत द्विपक्षीय चर्चा करतील. यावेळी व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. लिमासोल येथे मोदी व्यावसायिक नेत्यांना संबोधित करतील, जिथे भारत-सायप्रस आर्थिक भागीदारी वाढवण्यावर भर असेल.

सायप्रसने भारताला आंतरराष्ट्रीय मंचावर, विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यत्वासाठी, नेहमीच पाठिंबा दिला आहे. गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीत मोदी आणि क्रिस्टोडॉलिड्स यांची भेट झाली होती, जिथे भारताने सायप्रसच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा पुनरुच्चार केला होता. (हेही वाचा: Stock Market Today: शेअर बाजारात सौम्य घसरण; मध्यपूर्व तणावामुळे गुंतवणूकदार साशंक)

जी7 शिखर परिषद, कॅनडा: 16-17 जून

सायप्रस भेटीनंतर, पंतप्रधान मोदी 16 जून रोजी कॅनडातील कॅनानास्किस, अल्बर्टा येथे होणाऱ्या जी7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रवाना होतील. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरून मोदी या परिषदेत सहभागी होत आहेत, आणि हा त्यांचा सलग सहावा जी7 सहभाग असेल. जी7 मध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि अमेरिका यांचा समावेश आहे, आणि भारताला 2019 पासून सातत्याने अतिथी म्हणून आमंत्रित केले जात आहे. यंदा ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, युक्रेन आणि ब्राझील यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

या शिखर परिषदेत ऊर्जा सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्वांटम तंत्रज्ञान आणि जागतिक व्यापार यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. मोदी परिषदेच्या ‘आउटरीच सत्रा’त सहभागी होतील आणि जी7 नेत्यांशी द्विपक्षीय बैठका घेतील. मोदींची ही कॅनडा भेट जवळपास एका दशकातील पहिली आहे, आणि यामुळे भारताच्या आर्थिक वाढीचा आणि जागतिक पुरवठा साखळीतील महत्त्वाच्या भूमिकेचा उल्लेख होईल.

क्रोएशिया भेट: 18 जून

दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात, पंतप्रधान मोदी 18 जून रोजी क्रोएशियाला भेट देणार आहेत, जी भारतीय पंतप्रधानाची या देशातील पहिलीच भेट आहे. क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रेज प्लेन्कोव्हिक यांच्या निमंत्रणावरून होणाऱ्या या भेटीत मोदी त्यांच्याशी आणि राष्ट्रपती झोरान मिलानोव्हिक यांच्याशी चर्चा करतील. ही भेट भारत-क्रोएशिया संबंधांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण यापूर्वी 1967 मध्ये इंदिरा गांधी यांनी तत्कालीन युगोस्लाव्हियाला भेट दिली होती.