लाल किल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी बहादुर शाह जफरची वंशज असल्याचे सांगत न्यायालयात याचिका; जाणून घ्या कोर्टाचा निर्णय
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने त्यांना त्यांच्या मालमत्तेपासून वंचित ठेवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर बहादूर शाह जफरला इंग्रजांनी तुरुंगात टाकले आणि हद्दपार केले.
दिल्लीतील लाल किल्ला (Red Fort) ताब्यात घेण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर (Bahadur Shah Zafar) यांच्या वंशजांकडून ही याचिका दाखल केली होती. याचिका फेटाळून लावत न्यायालयाने विचारले की, तुम्ही दीडशे वर्षे काय करत होता. सुलताना बेगम असे या स्वतःला बहादूर शाह जफरची वंशज सांगणाऱ्या महिलेचे नाव आहे. सुलताना बेगमने आपण मुघल सम्राट बहादूर शाह जफर दुसरा याचा कायदेशीर वारस असल्याचे सांगून, लाल किल्ला आपल्या मालकीचा असावा असे म्हटले होते.
सुलताना बेगमने वकील विवेक मोरे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने त्यांना त्यांच्या मालमत्तेपासून वंचित ठेवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर बहादूर शाह जफरला इंग्रजांनी तुरुंगात टाकले आणि हद्दपार केले. त्याला म्यानमारमध्ये तुरुंगात ठेवण्यात आले होते, तिथेच त्याचा मृत्यू झाला. यानंतर इंग्रजांनी लाल किल्लाही आपल्या ताब्यात घेतला.
आता लाल किल्ल्याचा ताबा घेण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेबाबत बहादूर शाह जफरच्या वंशजांना कोर्टात जाण्यासाठी 150 वर्षे कशी लागली? असा सवाल न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी केला. त्या म्हणाल्या की, त्यांचे इतिहासाचे ज्ञान फारच कमकुवत आहे, परंतु 1857 मधील अन्यायाविषयी इतकी वर्षे गप्प का होता? याचबरोबर, याचिकाकर्ते बहादूर शाह जफरचे वंशज असल्याचे सिद्ध करणारे कोणतेही कागदपत्र नसल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाला आढळून आले. याबाबतही दिल्ली हायकोर्टाने टिपण्णी केली.
याचिकाकर्त्याच्या वकिलांनी लाल किल्ल्यावरील मालकी हक्काच्या याचिकेत विलंबाचे कारण सांगताना सांगितले की, सुलताना बेगम एक अशिक्षित महिला आहे. यावर 'अतिविलंब' झाल्याचा आधार घेत दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. दरम्यान, रिपोर्टनुसार, शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफरच्या वंशजांपैकी एक असलेल्या सुलताना बेगम कोलकात्यात राहतात आणि त्यांना भारतात दरमहा 6000 रुपये पेन्शन मिळते. 1980 मध्ये कोलकाता येथे मरण पावलेल्या बहादूर शाह जफरचा नातू मिर्झा बेदर समय यांच्याशी सुलताना बेगमचा विवाह झाला होता.
2004 मध्ये, एनडीए सरकारमध्ये असताना, ममता बॅनर्जी यांनी सुलताना बेगम आणि शाह यांच्या उर्वरित वंशजांची भेट घेतली होती. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी त्यांना 50 हजारांचा धनादेश देऊन मदत केली होती. याशिवाय त्यांना एक अपार्टमेंटही देण्यात आले होते. बहादूर शाह जफरची नात रौनक जमानी बेगम आणि तिची बहीण झीनत महल यांनीही 2007 मध्ये लाल किल्ल्यावर दावा केला होता.