Pension Fraud: एटामध्ये 36 वर्षीय महिला मृत वडिलांची पत्नी असल्याचे भासवून 10 वर्षे घेत होती पेन्शन; लाखो रुपयांची केली फसवणूक, पोलिसांकडून अटक
त्यांच्या आधी त्यांची पत्नी साबिया बेगम हिचा मृत्यू झाला होता. आरोपी महिला मोहसीना ही वजाहत उल्लाह खान यांची मुलगी असून, वडिलांच्या मृत्यूनंतर तिने आपल्या मृत वडिलांची पत्नी असल्याचे भासवत बनावट कागदपत्रे बनवली
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एटा (Etah) जिल्ह्यातील अलीगंजमध्ये एका महिलेने तब्बल 10 वर्षे सरकारी कर्मचाऱ्यांची फसवणूक करून लाखो रुपयांची पेन्शन मिळवली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी महिला आपल्या मृत वडिलांची पत्नी असल्याचे भासवून गेल्या 10 वर्षांपासून दरमहा 10,000 रुपये पेन्शन काढत होती. मोहसिना परवेझ असे या महिलेचे नाव असून ती 36 वर्षांची आहे. मोहसिना परवेझच्या माजी पतीने याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे.
मोहसीनाने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतल्याचे सांगितले जात आहे, त्यानंतर पतीने या फसवणुकीबाबत पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणाच्या माहितीवरून पोलिसांनी सोमवारी आरोपी महिलेला अटक केली. याप्रकरणी एडीएम प्रशासन आलोक कुमार सांगतात की, या प्रकरणाची चौकशी सुरू असून आरोपी महिलेला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
माहितीनुसार सेवानिवृत्त लेखापाल वजाहत उल्लाह खान यांचे 2 जानेवारी 2013 रोजी निधन झाले. त्यांच्या आधी त्यांची पत्नी साबिया बेगम हिचा मृत्यू झाला होता. आरोपी महिला मोहसीना ही वजाहत उल्लाह खान यांची मुलगी असून, वडिलांच्या मृत्यूनंतर तिने आपल्या मृत वडिलांची पत्नी असल्याचे भासवत बनावट कागदपत्रे बनवली आणि तेव्हापासून ती पेन्शन घेऊ लागली.
या प्रकरणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिने आतापर्यंत 12 लाख रुपयांपेक्षा जास्त पेन्शन घेतली आहे. मोहसीनाने 2017 मध्ये फारूक अलीशी लग्न केले पण त्यांच्यातील संबंध बिघडले आणि दोघांचा घटस्फोट झाला. फारुखला हे माहिती होते की, मोहसीना फसवणूकीने पेन्शन घेत आहे. घटस्फोटानंतर त्याने याबाबत तक्रार दाखल केली.
अलीगंज येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने केलेल्या प्राथमिक तपासात मोहसीनाने पेन्शन अर्जात तिच्या आईचे नाव आणि स्वतःचा फोटो वापरल्याचे उघड झाले आहे. जेव्हा हा अर्ज मोहसीनाने दाखल केला तेव्हा तो व्यवस्थित तपासला न गेल्याने मंजूर केला गेला. आता जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले तेव्हा मोहसीनाविरुद्ध अलीगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला, ज्यामध्ये आयपीसीच्या कलम 420, 467, 468, 471 आणि 409 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा: Bihar Shocker: बिहारच्या रुग्णालयातील दुर्दशा; युरीनल बॅग उपलब्ध नसल्याने रुग्णासाठी वापरली कोल्डड्रिंकची बाटली)
या प्रकरणात महिलेचा अर्ज मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका देखील तपासण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी आलोक कुमार यांनी तपासात आरोपीच्या पेन्शन अर्जाची पडताळणी आणि मंजुरी प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचे सांगितले. या प्रकरणात आरोपीशी संगनमत करून दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.