बिहार काँग्रेसकडून पोस्टरबाजीत जातियवादाचं संतापजनक प्रदर्शन

हे पोस्टर आता सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

पटनामध्ये काँग्रेसने लावलेले पोस्टर (Photo Credits: ANI)

बिहारमध्ये काँग्रेसकडून जातियवादाचे ओंगळवाणे प्रदर्शन करण्यात आले आहे. पटना येथील इनकमटॅक्स चबूतऱ्यावर काँग्रेसच्या वतीने लावण्यात आलेले एक पोस्टर चर्चेचा विषय ठरले आहे. या पोस्टरमध्ये काँग्रेस नेत्यांच्या प्रतिमा झळकत आहेत. मात्र, त्यांच्या फोटोवर त्यांच्या जातीधर्माचे तपशीलही लिहिण्यात आले आहेत.

पोस्टरच्या डाव्या कोपऱ्यात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रतिमा आहे. तर, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रतिमेसोबत पोस्टरवर इतर काँग्रेस नेत्यांच्याही प्रतिमा वापरण्यात आल्या आहेत. या सर्व नेत्यांच्या प्रतिमेसोबत त्यांच्या जातधर्मांची नावे लिहिली आहेत.

धक्कादायक असे की, पोस्टरवर झळकत असलेल्या राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर ब्राह्मण समुदाय असा उल्लेख आहे. पोस्टरवर सर्वात वर लिहिले आहे की, 'नव नियुक्त बिहार काँग्रेस कार्यकारिणी समितीत सामाजिक समतेची चूड कायम ठेवल्याबद्दल राहुल गांधी आणि शक्ती सिंह गोहिल यांचे आभार.' हे पोस्टर आता सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.