Parag Desai’s Death: वाघ बकरी चहाचे मालक पराग देसाई यांच्या मृत्यूनंतर व्यापारी संघटना आक्रमक; भटक्या कुत्र्यांच्या समस्येला तोंड देण्यासाठी सशक्त धोरणाची मागणी

इतक्या मोठ्या संख्येने अनियंत्रित भटक्या कुत्र्यांच्या उपस्थितीने मोठ्या प्रमाणात सुरक्षा चिंता निर्माण झाली आहे.

Dog (Representational Image; Photo Credit: Pixabay)

वाघ बकरी चहाचे (Wagh Bakri Tea) आश्वासक उद्योजक पराग देसाई (Parag Desai) यांचे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अचानक निधन झाल्यामुळे व्यापारी वर्गात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर आता महाराष्ट्रासाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) चे सरचिटणीस आणि ऑल इंडिया एडिबल ऑइल ट्रेडर्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी भटक्या कुत्र्यांमुळे (Stray Dog) मानवी जीवनाला निर्माण होत असलेल्या वाढत्या धोक्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

भारतात अंदाजे 30 दशलक्ष पाळीव कुत्रे आणि 35 दशलक्ष भटके कुत्रे आहेत. इतक्या मोठ्या संख्येने अनियंत्रित भटक्या कुत्र्यांच्या उपस्थितीने मोठ्या प्रमाणात सुरक्षा चिंता निर्माण झाली आहे. भारतामध्ये या प्राण्यांच्या आरोग्यसेवा आणि नियंत्रणासाठी प्रभावी यंत्रणांचा अभाव आहे आणि त्याचे परिणाम अधिकाधिक स्पष्ट होत आहेत.

भटके कुत्रे अनेकदा टोळीने एकत्र फिरतात आणि अत्यंत आक्रमक होऊ शकतात,  ज्यामुळे मानव आणि इतर प्राण्यांना धोका निर्माण होतो. देशभरात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. म्हणूनच रस्त्यावरील कुत्र्यांच्या अशा हल्ल्यांपासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी महापालिका आणि इतर स्थानिक प्राधिकरणे कंबर कसली आहेत. सीएआयटीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी याकडे लक्ष वेधले की, प्रत्येक वेळी भटक्या कुत्र्यांवर कारवाई केली जाते मात्र श्वानप्रेमी अशा उपाययोजनांना विरोध करण्यासाठी रॅली काढतात. हा विरोध विशेषतः संपूर्ण भारतातील समूह गृहनिर्माण निवासी वसाहतींमध्ये सामान्य आहे.

शंकर ठक्कर यांनी केंद्र सरकारला भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जाण्यासाठी एक मजबूत धोरण तयार करण्याचे आणि स्थानिक प्रशासनाद्वारे राज्य सरकारांनी त्याची कठोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. दरम्यान, वाघ बकरी चहा देशातील आघाडीच्या चहा कंपन्यांपैकी एक आहे. नुकतेच वाघ बकरी चहा समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे निधन झाले. अहवालानुसार, 15 ऑक्टोबर रोजी पराग देसाई यांना अपघातात ब्रेन हॅमरेज झाला होता. (हेही वाचा: Uttar Pradesh Shocker: भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने उपचाराअभावी 8 वर्षीय मुलीचा मृत्यू, आग्रा येथील घटना)

कुटुंबातील जवळचे मित्र आणि कंपनीचे मार्केटिंग हेड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग देसाई हे 15 ऑक्टोबरला संध्याकाळी घराजवळ फिरायला गेले होते. संध्याकाळी काही कुत्रे त्यांच्यावर भुंकायला लागले. कुत्र्याच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवत असताना ते घसरले आणि जमिनीवर पडले, त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.