Pandit Jasraj Passes Away: प्रसिद्ध शास्त्रीय गायक, पद्म विभूषण पंडित जसराज यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन; अमेरिकेमध्ये घेतला अखेरचा श्वास

लोक या दुःखातून सावरत आहेत तोपर्यंतच माहिती मिळत आहे की, प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले आहे.

Pandit Jasraj (Photo Credits: Facebook)

आज संध्याकाळीच बातमी आली होती की, मराठी, हिंदी, तमिळ दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन झाले. लोक या दुःखातून सावरत आहेत तोपर्यंतच माहिती मिळत आहे की, प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज (Pandit Jasraj) यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले आहे. पंडित जसराज यांनी सोमवारी अमेरिकेतील न्यू जर्सी (New Jersey) येथे अखेरचा श्वास घेतला. पंडितजींच्या जाण्याने संगीत विश्वातील अनेकांना फार मोठा धक्का बसला आहे. पंडित जसराज हे शास्त्रीय संगीताच्या मेवाती घराण्याशी संबंधित होते. जसराज यांनी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांची मुलगी मधुरा शांतारामशी लग्न केले होते.

एएनआय ट्वीट -

2020 मध्ये भारताने अनेक दिग्गज लोकांना गमावले आहे. यामध्ये यंदा कला विश्वाचे कधीही न भरून येण्यासारखे नुकसान झाले आहे. आज, सोमवारी निशिकांत कामाव व पंडित जसराज यांचे निधन झाले. 28 जानेवारी 1930 रोजी हरियाना येथे जन्मलेल्या पंडित जसराज यांना संगीताचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला. त्यांचा जन्म अशा कुटुंबात झाला ज्याच्या चार पिढ्या संगीताशी संबंधित होत्या. वडील पंडित मोतीराम यांनी संगीताचे प्रारंभिक शिक्षण पंडित जसराज यांना दिले. नंतर त्यांच्या भावाने त्यांना तबला संगीतकार म्हणून प्रशिक्षण दिले. त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षी गायक म्हणून प्रशिक्षण सुरू केले होते. (हेही वाचा: मराठी दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे वयाच्या 50 व्या वर्षी निधन; रितेश देशमुख, आर. माधवन, केदार शिंदे, अश्विनी भावे यांच्यासह अनेक सेलेब्जनी व्यक्त केले दुःख)

नरेंद्र मोदी ट्वीट -

वयाच्या 22 व्या वर्षी गायक म्हणून त्यांनी पहिला मैफिल सादर केली. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, संगीत रत्न अशा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, पंडित जसराज यांच्या निधनाच्या बातमीनंतर संगीतप्रेमींमध्ये दुःखाची लाट पसरली आहे. त्यांच्या आठवणीमध्ये अनेक जण सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. आयुष्याभरात त्यांनी मेवाती घराण्याचे 76 सुशिष्य तयार केले.

दरम्यान, पंडित जसराज यांनी संगीत जगतात 80 वर्षांहून अधिक काळ व्यतीत केला. या काळात त्यांना अनेक मोठे पुरस्कार मिळाले. त्यांच्या शास्त्रीय आणि अर्ध-शास्त्रीय गाण्यांना अल्बम आणि चित्रपटाच्या ध्वनीचीत्राचे रूप दिले गेले आहे. जसराज यांनी भारत, कॅनडा आणि अमेरिकेत संगीत शिकवले आहे व त्यांचे काही शिष्य प्रख्यात संगीतकारही बनले आहेत.