IPL Auction 2025 Live

महाराष्ट्रातील पाऊस व तुर्कीने निर्यातीस नकार दिल्याने कांद्याच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता

भारत तुर्कीमधून कांदा आयात करणार होता, मात्र आता तुर्कीने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. सोबतच महाराष्ट्रात पावसाचे वातावरण आहे

प्रतिकात्मक फोटो (Archived, edited, symbolic images)

गेल्या चार महिन्यांपासून सर्वसामान्य ग्राहकांना कांदा (Onion) अक्षरशः रडवत आहे. 100 रुपये किलो किंमतीचे कांदे खरेदी करणे हे प्रत्येकाच्या आवाक्यातील नाही. इतक्या दिवसानंतरही कांद्याचे भाव (Onion Price) कधी कमी होतील हे कोणालाच माहिती नाही. यावर उपाय म्हणून सरकारने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. परदेशी कांद्याची आवक वाढल्याने किंमती कमी होण्याची अपेक्षा होती, पण तेही आता अंधुक दिसत आहे. भारत तुर्कीमधून (Turkey) कांदा आयात करणार होता, मात्र आता तुर्कीने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. सोबतच महाराष्ट्रात पावसाचे वातावरण आहे, त्यामुळे कांद्याच्या किमत्ती अजून वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

तुर्की हे जगातील कांद्याचे प्रमुख उत्पादक आहे. दुसरीकडे, देशातील सर्वात मोठे कांदा उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा झालेल्या पावसामुळे कांद्याच्या आवकवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे किंमती पुन्हा वाढू शकतात. गुरुवारी देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात कांद्याची किरकोळ किंमत 100-140 रुपये प्रतिकिलो होती. मात्र केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या किंमती यादीनुसार दिल्लीत कांद्याची किरकोळ किंमत प्रति किलो 107 रुपये होती. (हेही वाचा: देशात तेलबियांचा पेरा घटला; कांदा, बटाट्यानंतर खाद्यतेलाच्या किंमतीत प्रतिलिटर 20 रुपयांची वाढ)

आजादपूर मंडईमध्ये महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश आणि गुजरात व्यतिरिक्त परदेशी कांद्याची आवक होती. ज्यामध्ये सर्वात जास्त किंमत, प्रति किलो 62.50-95 रुपये ही महाराष्ट्रातून आलेल्या कांद्याला मिळाली. मात्र पावसामुळे पुन्हा ही आवक कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या महाराष्ट्रातील लासलगाव येथे, गेल्या दोन दिवसांत कांद्याची रोजची आवक 12,000 ते 13,000 क्विंटलपर्यंत वाढली आहे. गेल्या वर्षी याच काळात कांद्याची रोजची आवक 25,000 ते 27,000 क्विंटल होती.