IPL Auction 2025 Live

One Nation, One Gold Rate: खुशखबर! देशभरात एकाच दराने विकले जाणार सोने; लवकरच लागू होणार ‘एक राष्ट्र, एक सोने दर’ धोरण

बुलियन एक्स्चेंज सुरू झाल्यामुळे ज्वेलर्समध्ये आनंदाची लाट आहे, कारण त्यांना आता आंतरराष्ट्रीय किमतीत सोने खरेदी करण्याची सुविधा मिळणार असून, त्यांना कोणतेही वाहतूक शुल्क भरावे लागणार नाही.

Gold | Photo Credits: Pixabay.com)

लवकरच सोने (Gold) खरेदीचे नियम बदलणार आहेत. सोन्याच्या किमतीतील तफावत लवकरच भरून निघेल, कारण देशात ‘एक राष्ट्र, एक सोने दर’ (One Nation, One Gold Rate) धोरण लागू केले जाऊ शकते. ‘एक राष्ट्रीय एक दर’ योजना संपूर्ण देशात लागू करण्यात यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती, आता सरकार ती लागू करण्याची तयारी करत आहे. सोन्याच्या किमतीवरील हा नियम लागू झाल्यास संपूर्ण देशात एकाच दराने सोने खरेदी करता येऊ शकेल.

सध्या तामिळनाडूपासून जम्मू-काश्मीरपर्यंत तुम्हाला सोन्याच्या किमतीत तफावत दिसेल. हे सोने एकच आहे, शुद्धतेचे मोजमाप देखील समान आहे परंतु देशातील विविध शहरांत त्याचे दर वेगवेगळे आहेत. ज्या बंदरातून सोने आयात करून उतरवले जाते, तेथून ते विविध राज्यांत पाठवले जाते. यामध्ये शिपिंग खर्च इत्यादी जोडल्यानंतर सोन्याची किंमत बदलते. मात्र, आयातीच्या वेळी सोन्याची किंमत एकच असते. किमतीतील तफावत दूर करण्यासाठी भारत सरकार दीर्घ काळापासून प्रयत्न करत आहे व आता कुठे बुलियन एक्स्चेंजमुळे (India International Bullion Exchange) ही कल्पना यशस्वी होताना दिसत आहे.

बुलियन एक्स्चेंज सुरू झाल्यामुळे ज्वेलर्समध्ये आनंदाची लाट आहे, कारण त्यांना आता आंतरराष्ट्रीय किमतीत सोने खरेदी करण्याची सुविधा मिळणार असून, त्यांना कोणतेही वाहतूक शुल्क भरावे लागणार नाही. सोन्याच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलतात ते फक्त वाहतूक शुल्क आकारल्यामुळे. बुलियन एक्स्चेंज सुरू झाल्यानंतर, ज्वेलर्स आणि बँका आंतरराष्ट्रीय दराने सोने आयात करतील, यामुळे सोन्याच्या दरात कोणताही फरक पडणार नाही. भारतीय बुलियन एक्सचेंज शेअर बाजाराप्रमाणे बाजार असेल. येथे सोन्याची खरेदी-विक्री होईल. (हेही वाचा: Arpita Mukherjee चा ईडी चौकशीत आश्चर्यकारक दावा; घरात 49.8 कोटी रक्कम असल्याची माहिती नव्हती)

मात्र यामध्ये सर्वच ज्वेलर्सना आंतरराष्ट्रीय दराने सोने खरेदी करण्याची सुविधा मिळणार नाही. जे ज्वेलर्स बुलियन एक्स्चेंजच्या श्रेणीत येतील तेच आंतरराष्ट्रीय किमतीनुसार सोने आयात करू शकतील. इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंजबाबत, भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी म्हणतात, ज्वेलर्स मालवाहतूक शुल्क न भरता आंतरराष्ट्रीय दराने सोने आयात करतील. भविष्यात या सोन्याच्या किमती वाढल्या नाहीत तर स्वस्त दराचा फायदा ग्राहकांना मिळेल. बुलियन एक्स्चेंज उघडल्यानंतर, आंतरराष्ट्रीय कंपन्या एकाच व्यासपीठावर सोने आणि चांदीच्या किमती दर्शवतील, याचा फायदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना होणार आहे.