Odisha Train Tragedy: सरकारकडून 17 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पत्नीने जिवंत पतीला मृत घोषित केले; रेल्वे आणि पोलिसांना सतर्क राहण्याचे आवाहन

हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्य सचिव पीके जेना यांनी रेल्वे आणि ओडिशा पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितले आहे, कारण लोक अशा प्रकारचे खोटे दावे करून नुकसानभरपाई मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात.

Odisha Train Accident | (Photo Credits: Twitter)

ओडिशामध्ये गेल्या शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात (Odisha Train Tragedy) आतापर्यंत 278 जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच हजारो लोक वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची घोषणाही रेल्वे आणि राज्य सरकारांकडून करण्यात आली आहे. अशात ओडिशातील एका महिलेने या नुकसान भरपाईची रक्कम मिळवण्यासाठी तिच्या पतीला मृत घोषित केले आहे. प्रकरण कटक जिल्ह्यातील मनियाबांदा येथील आहे. येथे राहणाऱ्या गीतांजली दत्ता नावाच्या महिलेने दावा केला की, तिचे पती विजय दत्ता यांचा शुक्रवारी रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता.

तिने पुढे असेही सांगितले की तिने स्वतः त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवली आहे. नंतर महिलेच्या दाव्याची चौकशी केली तसेच कागदपत्रे तपासण्यात आली असता महिलेचा दावा खोटा असून तिचा नवरा जिवंत असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे महिलेचा पती बिजय दत्ता याने देखील पत्नीच्या अशा खोटेपणाबद्दल स्वत: पत्नीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. (हेही वाचा:  ओडिशा रेल्वे दुर्घटना, मृतदेहांची ओळख, CBI तपास आणि जखमींवरील उपचार; जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी)

सध्या ही महिला फरार असल्याचे बोलले जात आहे. ही महिला गेल्या 13 वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत होती. महिला खोटे बोलत असल्याचे लक्षात आल्यानंतर सुरुवातीला पोलिसांनी तिला इशारा देऊन सोडले, पण नंतर तिच्या पतीने पोलिसात गुन्हा दाखल केला. महिलेला आपली सर्व मालमत्ता हडप करायची असल्याने तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पतीने पोलिसांकडे केली आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्य सचिव पीके जेना यांनी रेल्वे आणि ओडिशा पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितले आहे, कारण लोक अशा प्रकारचे खोटे दावे करून नुकसानभरपाई मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. दरम्यान, ओडिशा रेल्वे अपघातामधील मृतांच्या कुटुंबीयांना ओडिशा सरकारकडून 5 लाख रुपये, पीएम रिलीफ फंडामधून दोन लाख रुपये आणि रेल्वे मंत्रालयाकडून 10 लाख रुपये असे एकूण 17 लाख मिळणार आहेत.