Nitin Gadkari On Expressway Toll: एक वर्षात सर्व रस्ते होणार टोल नाका मुक्त, हायवेवर लागणार GPS ट्रॅकर; नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती

ज्यांना एक्सप्रेसवेवरुन प्रवास करायचा आहे त्यांनी टेक्नॉलॉजिचा वापर करत आवश्यक तेवढाच (जेवढा प्रवास आहे) टोल भरायचा आहे. म्हणजेच वाहन एक्सप्रेसवेवर जितके चालेल तितकाच टोल भरावा लागणार आहे.

Nitin Gadkari | (Photo Credits: Twitter)

एक्सप्रेसवेवरुन (Expressway ) प्रवास करताना टोल नाक्यांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आता बंद होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी याबाबत लोकसभेत माहिती दिली. गडकरी यांनी सांगितले की, पुढच्या एक वर्षभरात देशातील सर्व रस्ते टोल नाके मुक्त होतील. रस्त्यांवरील टोल नाके (Toll Plazas) हटवून त्या ठिकाणी टोल वसूलीसाठी GPS ट्रॅकर लावले जाणार आहेत. रस्त्यांवरील सर्व प्रवासात टेक्नॉलॉजिचा वापर केला जाईल, असेही गडकरी म्हणाले. जीपीएसद्वारे टोल ( GPS Toll Plazas) आकारला जाईल.

गडकरी यांनी सांगितले की, टोल प्लाजा बंद करण्याच्या योजनेवर काम सुरु आहे. ज्यांना एक्सप्रेसवेवरुन प्रवास करायचा आहे त्यांनी टेक्नॉलॉजिचा वापर करत आवश्यक तेवढाच (जेवढा प्रवास आहे) टोल भरायचा आहे. म्हणजेच वाहन एक्सप्रेसवेवर जितके चालेल तितकाच टोल भरावा लागणार आहे. (हेही वाचा, जुनी कार भंगारात विकल्यास नव्या गाडीवर मिळणार 'ऐवढा' डिस्काउंट, जाणून घ्या अधिक)

अमरोहा येथील भाजप खासदार कुंवर दानिश अली यांनी गढ मुक्तेश्वर येथील रस्तेविकास महामंडळाच्या टोलबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर गडकरी बोलत होते. उत्तरादाखल बोलताना गडकरी यांनी सांगितले की, आगोदरच्या सरकारने अधिक मलई खाण्यासाठी काही अशा ठिकाणी टोल प्लाजे उभे केले जे आज सीमेवर आहेत. हे निश्चितच चुकीचे आणि अन्यायकारक आहे.

नितीन गडकरी यांनी म्हटले की, आता हे टोल नाके काढायचे म्हटले तर टोल कंपन्या मोबदला मागतील. परंतू, सरकारने आगामी एक वर्षात देशातील सर्व टोल नाके हटविण्याची योजना आखली आहे. टोल नाके हटवणे याचा अर्थ केवळ टोल नाके बंद करणे आहे. टोल नव्हे. सर्व रस्त्यंवर जीपीएस ट्रॅकर लावण्यात येतील. आपले वाहन ज्या रस्त्याचा जेवढा वापर करेन तेवढाच त्याला टोल आकारला जाईल. आपले वाहन हायवेवर येताच जीपीएसच्या मदतीने फोटो घेतला जाईल तसेच हायवेवरुन उतरल्यानंतरही फोटो घेतलाजाईल. त्यानुसार आपल्याला टोल द्यावा लागेल.