Navratri 2024: नवरात्रीत श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा! देवीची पूजा करताना तरुणीने तलवारीने कापली आपली जीभ; Madhya Pradesh मधील धक्कादायक घटना

ग्रामीण भागात देवी अंगात येणे, जीभ किंवा गळा कापणे अशी प्रकरणे पाहायला मिळतात. निमाड प्रदेशात श्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या अशा परंपरांवर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही.

माता बागेश्वरी शक्ती धाम (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशभरात नवरात्री (Navratri 2024) 3 ऑक्टोबरपासून म्हणजेच गुरुवारपासून सुरू झाली आहे. या काळात देवीला प्रसन्न करण्यासाठी भक्त 9 दिवस विविध प्रकारची तपश्चर्या आणि पूजा करतात. अशात, मध्य प्रदेशातील खरगोन (Khargone)  जिल्ह्यातून एक अनोखा प्रकार समोर आला आहे. इथे माता बागेश्वरी शक्ती धामच्या अमृतकुंजमध्ये एका महिलेने तलवारीने आपली जीभ कापली. मुलीच्या तोंडातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या; मात्र तिला कोणीही रोखण्याचा प्रयत्न केला नाही. तिने आपली जीभ कापल्यानंतर तिच्या आईने तिला चुन्नी आणि गळ्यात फुलांची माळ घातली.

हे प्रकरण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी खरगोन जिल्ह्यातील भिकनगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सगुर-भगूर गावात असलेल्या संकुलामधून समोर आले आहे. सुरवा गावात राहणाऱ्या संतोषी नावाच्या मुलीने अमृत कुंडावर जाऊन लिंबू लावलेल्या तलवारीने आपली जीभ कापली. एवढेच नाही तर काही लोकांनी या कामात मुलीला मदतही केली. त्यांनी मुलीला तिच्या हाताततलवार दिली. त्यानंतर ते समोर हात जोडून 'जय मैय्या जय मैय्या' म्हणताना दिसले.

या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये मुलीच्या तोंडातून रक्त वाहत असून लोक देवीचा जयजयकार करत असल्याचे दिसत आहे. ही देवीची सर्वात कठीण पूजा असल्याचे घटनास्थळी उपस्थित देवी भक्तांचे म्हणणे आहे. नवरात्रोत्सवात यापेक्षा मोठी देवीची पूजा असूच शकत नाही. मंदिरात उपस्थित लोकांनी सांगितले की, संतोषी यांनी गेल्या वर्षी नवरात्रीमध्येही अशीच जीभ कापली होती. अशाप्रकारे श्रद्धेच्या नावाखाली या परंपरा विशेषतः खरगोन जिल्ह्यासह निमाड माळवा भागातील ग्रामीण भागात पाहायला मिळतात. (हेही वाचा: Madhya Pradesh: अंधश्रद्धेचा कळस! नवस फेडण्यासाठी 25 वर्षीय महिलेने देवीसमोर कापली आपली जीभ; नातेवाईकांचा रुग्णालयात नेण्यास नकार)

नवरात्रीच्या काळात इथले असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. ग्रामीण भागात देवी अंगात येणे, जीभ किंवा गळा कापणे अशी प्रकरणे पाहायला मिळतात. निमाड प्रदेशात श्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या अशा परंपरांवर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. इथल्या मंदिराजवळ एक तलाव देखील आहे. नवरात्रीमध्ये येथे स्नान करणाऱ्या भाविकांचे आजार बरे होतात, असेही मानले जाते.