मुंबईकर बायकर रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमध्ये अपघाती मृत्यू, अवजड वाहनाच्या धडकेत दुर्देवी अंत

मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील २४ वर्षीय रिद्धी ठक्कर हिचा छत्तीसगडमधील बस्तर परिसराच्या बाईक टूरदरम्यान अनोळखी अवजड वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. रायपूरहून कांकेरकडे जाणाऱ्या सुमारे २० बाईकर्सच्या गटासोबत ती प्रवास करत होती.

मुंबईकर बायकर रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमध्ये अपघाती मृत्यू, अवजड वाहनाच्या धडकेत दुर्देवी अंत
Road Accident | (Photo credit: archived, edited, representative image)|

मुंबईच्या कांदिवली पश्चिम भागात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्कर (Riddhi Thakkar) या तरुणीचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात बुधवारी सकाळी झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग 30 वरील मारकाटोला घाटाजवळ (Markatola Ghat) तिच्या दुचाकीला एका अनोळखी अवजड वाहनाने धडक दिली, ज्यात ती गंभीर जखमी झाली त्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. नक्की वाचा:  Mumbai Rash Driving: वांद्रा येथे बड्या उदयोजकाच्या मुलाच्या पोर्शे कारची दुचाकींना धडक; 19 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल (Watch Videos).

छत्तीसगड मध्ये अपघात कसा झाला?

रिद्धी ठक्कर सुमारे 20 बाईकर्सच्या गटासोबत रायपूरहून बस्तर भागाकडे प्रवास करत होती. पुरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, रायपूरपासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या मारकाटोला घाटाजवळ सकाळी सुमारे ६ वाजता हा अपघात घडला. ती बजाज अव्हेंजर ही दुचाकी चालवत होती, तेव्हा एका अवजड वाहनाने तिच्या बाईकला जोरदार धडक दिली. या धडकेत तिच्या पायांना गंभीर दुखापत झाली.

धक्कादायक बाब म्हणजे, धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पळून गेले. पोलीस सध्या हे वाहन आणि त्याचा चालक शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

तातडीने मदत, तरीही जीव वाचला नाही

अपघातानंतर सोबतच्या बाईकर्सनी तत्काळ आपत्कालीन सेवा डायल ११२ शी संपर्क साधला. रिद्धीला रुग्णवाहिकेतून शेजारच्या कांकेर जिल्ह्यातील चराम येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी धमतरी येथील खासगी रुग्णालयात हलवले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

अपघाताचा तपास सुरू

पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा तसेच फरार झालेल्या अवजड वाहनाचा तपास सुरू केला आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतील बाईकर्सचा हा गट रायपूरमध्ये एकत्र येऊन बस्तर भागाच्या सहलीसाठी निघाला होता, तेव्हा ही दुर्घटना घडली.

रिद्धी ठक्करच्या निधनाने बाईकर्स समुदायात तसेच तिच्या कुटुंबीय व मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे लांब पल्ल्याच्या बाईक टूरदरम्यान सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 13, 2026 10:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).