मुकेश अंबानी ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; Facebook-Reliance Jio करारानंतर श्रीमंतांच्या यादीत अंबानी पुन्हा अव्वल

सोशल मीडियामधील सर्वात मोठी कंपनी फेसबुकने रिलायन्स जिओचे 9.99% शेअर्स 43,574 कोटींना विकत घेतले आहेत.

Mukesh Ambani (Photo Credits: IANS)

फेसबुक जिओ करारानंतर (Facebook-Reliance Jio Deal) रिलायन्स ग्रुपचे (Reliance Group) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) पुन्हा एकदा आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. सोशल मीडियामधील सर्वात मोठी कंपनी फेसबुकने रिलायन्स जिओचे 9.99% शेअर्स 43,574 कोटींना विकत घेतले आहेत. अशी माहिती बुधवारी रिलायन्स ग्रुपकडून देण्यात आली. या करारानंतर मुकेश अंबानी यांची संपत्ती 4.7 डॉलर्स बिलियन वरुन 49.2 बिलियन डॉलर्सवर गेली आहे. त्यामुळे मुकेश अंबानी यांनी अलिबाबाच्या (Alibaba) जॅक मा (Jack Ma) यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला आहे. (Reliance-Facebook Deal: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्सने फेसबुक आणि विविध कंपन्यांसोबत आतापर्यंत केलेले महत्त्वाचे व्यवहार)

Bloomberg Billionaires Index नुसार, अंबानी यांची संपत्ती ही जॅक मा यांच्या संपत्तीपेक्षा 3.2 बिलियन डॉलरने जास्त आहे. मार्चमध्ये कच्चा तेलाच्या किंमतीत 30% घसरण झाल्याने अलिबाबाचे जॅक मा हे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. त्यावेळेस रिलायन्स इंडस्ट्रीला एका शेअरमागे 1,094.95 रुपयांचा तोटा झाला होता. गेल्या 10 वर्षातील हा सर्वात मोठा तोटा असून यामुळे अंबानी यांना एकूण 5.8 बिलियन डॉलरचा तोटा सहन करावा लागला होता. या तोट्यानंतर श्रीमंतांच्या जागतिक क्रमावारी मुकेश अंबानी यांची 17 व्या स्थानावर घसरण झाली होती.

जगातील सर्वात बलाढ्य टेक्नॉलॉजी कंपनी आणि भारतातील टेक सेक्टरमधील सर्वात मोठ्या कंपनीची ही पार्टनरशीप 43,574 कोटींची आहे. या कराराबद्दल माहिती देताना रिलायन्स  इंडस्ट्री  लिमिटेड यांनी सांगितले की, "फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि मुकेश अंबानी हे दोघं मिळून भारताच्या डिजिटल ट्रान्सफॉरमेशनमध्ये सहभागी होण्याचा या पार्टनरशीपचा उद्देश आहे."

या गुंतवणूकीसोबतच जिओ फ्लॅटफॉर्म रिलायन्स रिटेल आणि व्हॉट्सअॅप यांच्यात देखील व्यावसायिक पार्टनरशीपचा करार झाला आहे. या करारानुसार, रियायन्स रिटेलचा व्यवसाय हा व्हॉट्सअॅपद्वारे वाढवण्याचा प्रयत्न असेल.