Movie Songs At Weddings: लग्न-उत्सवात हिंदी चित्रपटातील गाणी लावणे ठरेल कॉपीराइटचे उल्लंघन? केंद्राने केले स्पष्ट
डीपीआयआयटीने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, कॉपीराइट सोसायट्यांना कलम 52(1)(za) चे उल्लंघन न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तसे न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
लग्न (Wedding) किंवा तत्सम समारंभात अनेक चित्रपट गाणी (Movie Songs) वाजवली जातात. लोक बेभान होऊन अशा गाण्यांच्या तालावर नाचतात. मात्र काही वेळा अशी गाणी वाजवल्याने कॉपीराइट नियमांचे उल्लंघन (Copyright Violation) होण्याची शक्यता असते. यामुळे कायदेशीर अडचणी निर्माण झाल्याच्या काही घटनाही समोर आल्या आहेत. आता केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, विवाहसोहळे आणि संबंधित कार्यक्रमांमध्ये चित्रपट गाणी वाजवणे कॉपीराइट नियमांचे उल्लंघन मानले जाणार नाही आणि त्यासाठी कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. हॉटेल उद्योगाच्या विनंतीवरून केंद्र सरकारने हे निर्देश जारी केले आहेत.
कॉपीराइट कायद्यानुसार, एखाद्या संगीतावर कॉपीराइट असल्यास ते संगीत सार्वजनिक कार्यक्रमात वाजवताना कॉपीराइटशी संबंधित नियमांचे पालन करावे लागते. हे पाहता गाण्यांवर कॉपीराइट असलेल्या कंपन्या चित्रपट गाण्यांसाठी परवाना शुल्काची मागणी करत आहेत. अशा स्थितीत हॉटेल आणि सार्वजनिक ठिकाणी होणारे अन्य कार्यक्रम कायदेशीर कचाट्यात अडकण्याची भीती आहे.
ही परिस्थिती पाहता हॉटेल उद्योगाने हे नियम शिथिल करण्याची अनेकवेळा केंद्र सरकारला विनंती केली होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 24 जुलै रोजी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) ने या संदर्भात एक सार्वजनिक सूचना जारी केली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, डीपीआयआयटीला सार्वजनिक आणि भागधारकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ज्यात असा आरोप आहे की कॉपीराइट कंपन्या लग्न समारंभात चित्रपट गाणी वाजवण्यासाठी रॉयल्टी आकारत आहेत.
डीपीआयआयटीने म्हटले आहे की, सार्वजनिक कार्यक्रमात चित्रपटातील गाणी वाजवल्याने कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन होत नाही. याच्याशी निगडीत कलमात असे नमूद केले आहे की, कोणत्याही धार्मिक समारंभात किंवा केंद्र, राज्य सरकार किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या अधिकृत समारंभात साहित्यिक, नाटकीय किंवा संगीतविषयक कामे करणे कॉपीराइटचे उल्लंघन करत नाही. त्यात लग्न समारंभ आणि त्याच्याशी निगडित इतर सामाजिक कार्ये देखील समाविष्ट आहेत. (हेही वाचा: गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय! मणिपूरच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची CBI करणार चौकशी)
डीपीआयआयटीने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, कॉपीराइट सोसायट्यांना कलम 52(1)(za) चे उल्लंघन न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तसे न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. या आदेशाचे स्वागत करताना पूना हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित शर्मा म्हणाले की, सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, लग्नसमारंभ आणि संबंधित कार्यक्रमांमध्ये गाणी वाजवण्यासाठी कोणत्याही कॉपीराइट सोसायटीची परवानगी घेण्याची गरज नाही. कोलकाता आणि गुवाहाटी येथील आमच्या काही सदस्यांविरुद्ध विविध न्यायालयांमध्ये अशी मानहानीची प्रकरणे प्रलंबित असल्याने हा आदेश सर्वसामान्यांना आणि हॉटेल उद्योगाला मोठा दिलासा म्हणून समोर आला आहे.