Most Popular World Leaders; जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत PM Narendra Modi पहिल्या स्थानावर; Joe Biden, Rishi Sunak टॉप-5 मधून बाहेर (See Full List)

बिडेन या यादीत 40 टक्के मान्यता रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहेत.

PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही पंतप्रधान मोदींची प्रसिद्धी पाहायला मिळते. मॉर्निंग कन्सल्टच्या (Morning Consult) ताज्या सर्वेक्षणात हे दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते (Most Popular World Leaders) म्हणून निवड झाली आहे. मॉर्निंग कन्सल्टच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आलेल्या यादीत पीएम मोदी 78 टक्के मान्यता रेटिंगसह जागतिक नेत्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत.

मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह 16 देशांच्या दिग्गज नेत्यांना मागे टाकले आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावरील मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांना 68 टक्के मान्यता मिळाली आहे. तिसर्‍या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे आहेत, ज्यांना 58 टक्के मान्यता रेटिंग मिळाली आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी चौथ्या क्रमांकावर आहेत. मेलोनी यांचे रेटिंग 52 टक्के आहे. ब्राझीलचे अध्यक्ष लुला डी सिल्वा 50 टक्के रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहेत.

या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना पहिल्या पाचमध्येही स्थान मिळालेले नाही. बिडेन या यादीत 40 टक्के मान्यता रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे नाव येते ज्यांचे रेटिंग 40 टक्के आहे. दुसरीकडे, सुनक यांनी 30 टक्के मान्यता रेटिंगसह या यादीत 10 वे स्थान मिळवले आहे. (हेही वाचा: जगातील टॉप-20 श्रीमंतांच्या यादीतून गौतम अदानी बाहेर; किती आहे संपत्ती? जाणून घ्या)

सर्वेक्षणानुसार, 2021 नंतर पीएम मोदींची लोकप्रियता आणखी वाढली आहे. 'मॉर्निंग कन्सल्ट'चे हे रेटिंग 26 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यानचे आहे. मॉर्निंग कन्सल्ट दररोज 20,000 पेक्षा जास्त जागतिक मुलाखती घेते. मुलाखतीत मिळालेल्या उत्तरांच्या आधारे जागतिक नेत्याबद्दल तयार केलेला डेटा तयार केला जातो.