Good News! मोदी सरकारने PM Garib Kalyan Yojana ची मुदत सहा महिने वाढवली; आता 30 सप्टेंबर 2022 पर्यंत गरिबांना मिळणार मोफत रेशन 

ही योजना फक्त शिधापत्रिकाधारकांपुरती मर्यादित आहे

PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मोदी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PM Garib Kalyan Yojana) 6 महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. म्हणजेच आता 30 सप्टेंबर 2022 पर्यंत गरिबांना मोफत रेशन मिळत राहील. आतापर्यंत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची अंतिम तारीख 31 मार्च 2022 होती. याआधी यूपीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी मोफत रेशन योजना 3 महिन्यांसाठी वाढवली आहे. कोरोना संकटाच्या काळात मार्च 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जाहीर करण्यात आली होती.

गरीब कल्याण अन्न योजनेचा उद्देश कोरोना महामारीमुळे निर्माण होणारा आर्थिक ताण कमी करणे हा आहे. सुरुवातीला PMGKAY योजना एप्रिल-जून 2020 या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती, परंतु नंतर ती 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. यानंतर ती 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आणि आता पुन्हा ती 30 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. कोरोना संसर्गानंतर लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहासाठी अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी सरकारने मोफत रेशन योजना सुरू केली होती.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरिबांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य मोफत मिळते. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत ओळखल्या गेलेल्या 80 कोटी शिधापत्रिकाधारकांना सरकार मोफत रेशन पुरवते. मोफत शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानातून मिळणाऱ्या अनुदानित धान्याव्यतिरिक्त प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत रेशन दिले जाते. (हेही वाचा: नितीन गडकरी यांची मोठी घोषणा! आता प्रत्येक वाहनात द्यावे लागणार 'हे' सेफ्टी फीचर; 1 ऑक्टोबरपासून लागू होणार नियम)

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत धान्याचा लाभ ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्यांना मिळत नाही. ही योजना फक्त शिधापत्रिकाधारकांपुरती मर्यादित आहे. रेशन कार्डवर ज्या रेशन दुकानातून मोफत धान्य मिळेल त्याच रेशन दुकानात या योजनेंतर्गत मोफत धान्य मिळेल.