शिल्पकार राम सुतार: सरदार पटेल यांचा जगप्रसिद्ध पुतळा साकारणारा मराठी माणूस; एक यशोगाथा

एका मराठी माणसाचे एवढे उत्तूंग यश पाहून मराठी मनाचा उर अभिमानाने भरुन तर येणारच ना?

शिल्पकार राम सुतार (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

गुजरातमधील वडोदरा येथे सरदार पटेलांचे भव्य स्मारक साकार झाले. त्याची ख्याती जगभरात पसरली. जगातील सर्वात उंच स्मारक म्हणून त्याची जगाच्या इतिहासात यापूढे विक्रमी नोंद घेतली जाईल. सरदार पटेलांच्या स्मारकाच्या रुपात गुजरातने हा विक्रम स्वत:च्या नावावर केला. पण, हा विक्रम केवळ एकट्या गुजरात किंवा गुजरात सरकारचा नाही. त्यात एका मराठी माणसाचेही अतुलनीय योगदान आहे. या मराठी माणसाचे नाव आहे शिल्पकार राम सुतार. या नावाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाला खरा आकार दिला. हेच स्मारक आज 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' म्हणून मोठ्या डौलात उभे आहे.

शिल्पकार राम सुतार हे नाव साधे नाही. तंत्रज्ञान, बदलती सामाजिक अभिरुची, नॅनोटेक्नॉलॉजी तसेच, कलेतील बाजारुपणा यात काळाच्या ओघात कलातिहास सातत्याने बदलत गेला. त्यात अनेक कलांचा ऱ्हास झाला. काही त्या मार्गावर आहेत. मात्र, स्मारक-शिल्पकला जिवंत राहिली. कारण, राज्ययंत्रणा, लोकभावना आणि पूर्वजांचा इतिहास यांच्यातील संवाद शिल्पकला जपते. त्यामुळे शिल्पकलेला डिजिटल यूग अद्याप तरी पर्याय देऊ शकले नाही. अत्यंत कष्टप्रद, वेळखाऊ आणि तितकीच किचकट असलेली ही कला आजही सरकारदरबारी आपले वजन कायम राखून आहे. असे असले तरी, ही कला पुढे चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या शिल्पकारांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. अशा स्थितीत शिल्पकार राम सुतार हे एखाद्या विद्यापीठासारखे भासतात. विविध आणि तितक्याच महाकाय आकाराची शिल्पे घडविणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य.

शिल्पकार राम सुतार आज ९३ वर्षांचे आहेत. १९६० पासून त्यांनी स्वतंत्र स्टुडिओ उभारला आणि कलेची साधना सुरु केली. आजवर त्यांनी अनेक लोकप्रिय व्यक्तिमत्वांची शिल्पे साकारली आहेत. संसद भवन परिसरातील मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) हे पुतळे पाहिले की राम सुतार यांच्या कलाकारीचा आवाका आपल्या ध्यानात येतो. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही अनेक पुतळे सुतार यांनी साकारले आहेत. टोकिओ येथे राम सुतार यांनी साकारलेला रविंद्रनाथ टागोर यांचा पुतळात तर आकर्षणाचा केंद्रबिंदूच म्हणायला हवा. राजधानी दिल्लीत सुतारांनी साकारलेले राजीव गांधी यांचे भित्तिशिल्प हा सुद्धा शिल्पकलेचा एक उत्कृष्ठ नमुनाच. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या शिल्पांच्या रुपात त्यांनी तीन पिड्यांची कारकीर्द एकाच धाग्यांत बांधलेली पहायला मिळते. एक कलाकार म्हणून इतकी विविधता आणि नवनिर्मिती एखाद्याच कलावंताच्या वाट्याला येते. जी सुतांराच्याही वाट्याला आल्याचे पाहायला मिळते.

केंद्रीय सांस्कृती खात्याकडून दिला जाणारा ‘रवीन्द्रनाथ टागोर संस्कृती पुरस्कार’ही राम सुतार यांना नुकातच मिळाला. २०१४ पासून २०१६ पर्यंतचे ‘रवीन्द्रनाथ टागोर संस्कृती पुरस्कार’ अलिकडेच जाहीर झाले. यात सुतार यांच्या नावाची घोषणा होणे हे अपेक्षीत होते. त्यांना मानाच्या अशा पद्म पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. मूळ सौंदर्याला कोणताही धक्का न लावता सर्व सौदर्यमुल्यांचा मेळ घालत हुबेहुब शिल्पाकृती उभारणे हे एक सुतारांच्या कलेचे खास वैशिष्ट्य. (हेही वाचा, खाशाबा जाधव: हुकणाऱ्या सामन्यात दाखवला डाव; ऑलिम्पिकमध्ये पदकावर कोरले नाव)

पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्पे, ‘चंबळा आणि तिला बिलगलेली दोन बालके’हे शिल्प चंबळ नदीवरील गांधीसागर धरणानजीक आहे. आणि हे शिल्प या धरणाचे लाभ मिळणाऱ्या मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांचे प्रतीक म्हणूनही ओळखले जाते. अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदू मिलचे प्रस्तावित आंबेडकर स्मारकाचही राम सुतार यांच्याच संकल्पनेतून साकारणार आहे. ही सर्व स्मारके सुतार यांच्या कलाकारीचा नमुना म्हणून इतिहासात अनमोल ठेवा म्हणून जपला जाईल.

खरे तर गेली अनेक दशकं (सुमारे ५० वर्षे) राम सुतार हे दिल्लीतच राहतात. पण, ते मुळचे धुळ्याचे आहेत. त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध अशा 'जेजे स्कूल ऑफ आर्ट'मधून शिल्पकलेचे धडे घेतले. त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रच नव्हे तर, संपूर्ण भारताचे नाव कलेच्या प्रांतात उंचावले आहे. एका मराठी माणसाचे एवढे उत्तूंग यश पाहून मराठी मनाचा उर अभिमानाने भरुन तर येणारच ना?