Mann Ki Baat: पीएम नरेंद्र मोदींचा रेडीओ कार्यक्रम 'मन की बात' ने आतापर्यंत केली कोट्यावधी रुपयांची कमाई; जाणून घ्या आकडेवारी
आतापर्यंत या कार्यक्रमातून 30 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता अखिल भारतीय रेडिओ आणि दूरदर्शनवर 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रम घेऊन येतात. आतापर्यंत या कार्यक्रमातून 30 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने राज्यसभेत सांगितले की, 2014 पासून आतापर्यंत या कार्यक्रमाद्वारे एकूण 30.80 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. या कार्यक्रमाने सन 2017-18 मध्ये सर्वाधिक 10.64 कोटींची कमाई केली होती. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी एका लेखी उत्तरात उच्च सदनाला सांगितले की, आतापर्यंत 'मन की बात' कार्यक्रमाचे 78 भाग प्रसार भारतीद्वारे प्रसारित केले गेले आहेत.
रेडिओ आणि दूरदर्शनशिवाय 'मन की बात' कार्यक्रम हा 91 खासगी वाहिन्या आणि डीटीएच प्लॅटफॉर्मवर प्रसारित केले गेले आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार 2014-15 मध्ये या कार्यक्रमाद्वारे 1.16 कोटी रुपये मिळाले होते. यानंतर सन 2015-16 मध्ये ही आकडेवारी वाढून 2.81 कोटी रुपयांवर गेली. त्यानंतर 2016-17 मध्ये 5.14 कोटी मिळाले. 2017-18 मध्ये सर्वाधिक कमाई 10.64 कोटी रुपये झाली होती. त्याचबरोबर 2018-19 मध्ये या कार्यक्रमाने 7.47 कोटी रुपये कमावले. त्यानंतर 2019-20 मध्ये त्याला 2.56 कोटी रुपये मिळाले. 2020-21 मध्ये या कार्यक्रमाने फक्त 1.02 कोटी रुपये कमावले. (हेही वाचा: Covid-19 Deaths: देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही; केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती)
केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले की, मन की बात कार्यक्रम हा देशातील सर्वात लोकप्रिय रेडिओ कार्यक्रम आहे. बार्कच्या रेटिंगनुसार 2018 ते 2020 या वर्षात 'मन की बात' कार्यक्रमाची व्ह्यूअरशिप 6 कोटी ते 14.35 कोटी इतकी होती. ते म्हणाले की, या कार्यक्रमाचा उद्देश रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे हा आहे. या व्यतिरिक्त देशातील प्रत्येक नागरिकाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींशी संपर्क साधण्याची संधी मिळाली आहे. मन की बात हा कार्यक्रम प्रसार भारतीच्या स्त्रोतांद्वारे प्रसारित केला जात आहे. यासाठी कोणतेही बाह्य खर्च किंवा संसाधने वापरली गेली नाहीत.