Manipur Violence: मणिपूरात सैन्यातील जवानाचं घरातून अपहरण करुन निर्घृण हत्या
रविवारी त्यांचा मृतदेह इंफाळ पूर्व जिल्ह्यात सापडला.
मणिपूरमध्ये मे महिन्यापासून हिंसाचार (Manipur Violence) हा सुरु आहे. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. मणिपूरमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारात एक मोठी घटना समोर आली आहे. येथे भारतीय सैन्याच्या (Indian Army) एका जवानाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. शनिवारी काही सशस्त्र लोकांनी या जवानाचे अपहरण केले होते. रविवारी त्यांचा मृतदेह इंफाळ (Imphal) पूर्व जिल्ह्यात सापडला. पोलिसांचे म्हणणे आहे की, भारतीय लष्कराचा शिपाई काही दिवस सुट्टीवर घरी आला होता. (हेही वाचा - Delhi Crime: पार्किंगवरून वाद, पत्नी आणि मुलासमोर चाकूने भोसकून हत्या)
शनिवारी तीन सशस्त्र लोकांनी डिफेन्स सर्व्हिस कॉर्प्सच्या (डीएससी) सेर्टो थांगथांग कोमचे त्यांच्या राहत्या घरातून बंदुकीचा धाक दाखवत अपहरण करण्यात आले आहे. अपहरणकर्त्यांनी त्यांची गोळी झाडून हत्या केली. त्यांचा मृतदेह इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील खुनिंगथेक गावात पोलिसांना सापडला. या जवानाच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबीयांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान शहीद जवानाच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करण्यासाठी सैन्याचे एक पथक त्यांच्या घरी पोहोचले आहे. भारतीय सैन्य या भ्याड हत्येचा तीव्र शब्दात निषेध करते आणि या कठीण प्रसंगी त्यांच्या शोकाकुल कुटुंबासोबत उभे राहील, असं सैन्याच्या वतीने सांगण्यात आलं आहे.