1 मार्च पासून मोठा बदल; 'या' बँकेच्या ATM मधून निघणार नाहीत 2000 रुपयांच्या नोटा
एका बँकेने असा निर्णय घेतला आहे की, ते आता 2000 रुपयांची नोट एटीएम मशीनमध्ये (ATM Machine) ठेवणार नाहीत. त्या बदल्यात बँकेने 200 रुपयांच्या अधिक नोटा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे
2000 रुपयांच्या (2000 Note) नोटेसंदर्भात एक मोठी बातमी आहे. एका बँकेने असा निर्णय घेतला आहे की, ते आता 2000 रुपयांची नोट एटीएम मशीनमध्ये (ATM Machine) ठेवणार नाहीत. त्या बदल्यात बँकेने 200 रुपयांच्या अधिक नोटा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी बँक असलेल्या इंडियन बँकेने (Indian Bank) हा निर्णय घेतला आहे.
इंडियन बँकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या एटीएममध्ये ग्राहकांना मदत करण्यासाठी 200 रुपयांच्या जास्त नोटा ठेवण्याचा व 2000 रुपयांच्या नोटा लोड करणे थांबविण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. इंडियन बँकेने आपल्या सर्व शाखांमध्ये ही माहिती दिली आहे.
ग्राहकांना 2000 रुपयांच्या नोटा चलनात वापरणे अवघड ठरत आहे, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 1 मार्चपर्यंत सर्व इंडियन बँकेच्या एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नोटा काढून, त्याजागी 200 च्या नोटा बदलल्या जातील. इंडियन बँकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा निर्णय बँक मर्जरसाठीही असेल. इंडियन बँकेच्या या निर्णयाचे अद्याप इतर सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी अनुकरण केले नाही. मात्र वित्तीय ग्राहक व यंत्रणेचे (FSS) अध्यक्ष व्ही. बालसुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नोट लोड करणे थांबवणे याबाबत त्यांच्यापर्यंत अधिकृतरित्या कोणतीही माहिती पोहचली नाही. (हेही वाचा: Fact Check: 2000 हजारांच्या नोटा बंद होणार? 1 हजाराच्या नव्या नोटा चलनात येणार? जाणून घ्या काय आहे सत्य)
बालसुब्रमण्यम म्हणाले की, बँकांच्या विलीनीकरणामुळे मोठ्या शहरांमध्ये एटीएमची संख्या कमी होऊ शकते. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दोन हजार रुपयांच्या नोटा छापणे बंद केले आहे. रिझर्व्ह बँकेने याचा एका आरटीआय उत्तरात खुलासा केला आहे. आरबीआयने या आर्थिक वर्षात (2019-20) दोन हजार रुपयांची एकही नोट छापली नाही. नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदी झाल्यानंतर 2000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या. 2016-17 या आर्थिक वर्षात दोन हजाराच्या, 3,542.991 दशलक्ष नोटा छापल्या गेल्या, असे आरबीआयने आरटीआयला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.