Mahua Moitra Case: महुआ मोईत्रांच्या निलंबनावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

अदानी समूह आणि पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी मोईत्रा आणि व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्यामध्ये पैशाचा व्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

TMC MP Mahua Moitra (Photo Credit: ANI)

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्या निलंबनावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे. या प्रकरणी आता मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात पुढील सुनावणी होणार आहे. या निर्णयामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महुआ यांना सहभागी होता येणार नाही.  TMCच्या महुआ मोईत्रा यांनी डिसेंबरमध्ये संसदेचे सदस्यत्व गमावले. लोकसभेच्या आचार समितीने कॅश फॉर क्वेरी म्हणजेच पैशासाठी प्रश्न विचारल्याप्रकरणी कारवाई करताना महुआचे सदस्यत्व रद्द केले होते. (हेही वाचा - Mahua Moitra expelled from Lok Sabha: महुआ मोइत्रा यांनी गमावलं लोकसभेचं सभासदस्यत्व; Cash for Query प्रकरणात दोषी)

अदानी समूह आणि पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी मोईत्रा आणि व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्यामध्ये पैशाचा व्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेस नेत्या महुआ मोईत्रा यांनी लोकसभेच्या कामकाजात सहभागी होण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.

महुआ मोईत्रांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा सचिवालयाकडून उत्तर मागितले आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.  लोकसभा सचिवालयाला तीन आठवड्यांत उत्तर द्यावे लागेल आणि त्यानंतर याचिकाकर्त्याची इच्छा असेल तर त्याला उत्तर दाखल करण्याचा पर्यायही असेल. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 मार्च 2024 रोजी होणार आहे.