Maharashtra Assembly Winter Session 2022: विधानसभा अध्यक्षांबाबत Jayant Patil यांनी असंवैधानिक शब्द वापरल्याचा आरोप, वर्षभराच्या निलंबनाची मागणी; पहा विधानसभेत नेमकं घडलं काय (Watch Video)
यावरून आज दोन वेळेस सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आले आहे.
नागपूर मध्ये सध्या महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) सुरू आहे. आज विधानसभेमध्ये दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशी करणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यावरून विरोधक आक्रमक झाले. विरोधकांना बोलू दिलं जात नाही असं म्हणून काहीजण वेल मध्ये उतरले आणि एनसीपी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) त्याचवेळी बोलताना 'तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका' असं म्हणत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना सुनावलं. पण 'निर्लज्जपणा' या शब्दावरून सत्ताधारी आक्रमक झाले आणि त्यांनी किमान वर्षभराच्या निलंबनाची मागणी केली आहे.
विधानसभेमध्ये पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू झाल्याने आता बोलू देऊ शकत नाही असं विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना सांगत होते. त्यावर पवारांनी किमान भास्कर जाधवांना बोलू द्या अशी मागणी केली. पण बाचाबाची वाढत गेली.
विधानसभेत पहा नेमकं काय घडलं?
जयंत पाटील यांनी असंवैधानिक शब्द वापरल्याचा आरोप सत्ताधार्यांकडून करण्यात आला आहे. यावरून आज दोन वेळेस सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान आता जयंत पाटलांच्या निलंबनासाठी अध्यक्षांच्या दालनात बैठक सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष हे एक मानाचं पद आहे. त्यांच्याबद्दल बोलताना असंवैधानिक शब्दाचा वापर योग्य नसल्याचं सत्ताधार्याकडून मीडीयाशी बोलताना काही आमदारांनी म्हटलं आहे.
दरम्यान दिशा सॅलियनचा मृत्यू हा 14 व्या मजल्यावरून तोल गेल्याने झाला आहे असा रिपोर्ट काही दिवसांपूर्वी सीबीआय कडून करण्यात आला आहे. पण या 28 वर्षीय मुलीच्या मृत्यूवरून मागील 2 वर्षांपासून भाजपा कडून राजकारण केले जात आहे. दिशा ही सुशांतसिंग राजपूत या अभिनेत्याची काही काळ मॅनेजर होती. आणि त्या दोघांचा मृत्यू 8-10 दिवसांच्या फरकाने दोन वर्षांपूर्वी झाला आहे.