ओडिशाच्या पाठोपाठ पंजाबमध्येही 1 मे पर्यंत लॉक डाऊन जाहीर; मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची घोषणा
सध्या चालू असलेल्या लॉक डाऊनला (Lockdown) 1 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा पंजाब सरकारने केली आहे
देशात ज्या प्रकारे कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग सातत्याने वाढत आहे, हे पाहता पंजाब (Punjab) सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सध्या चालू असलेल्या लॉक डाऊनला (Lockdown) 1 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा पंजाब सरकारने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाउनची घोषणा केली आहे, परंतु पंजाब आणि ओडिशाच्या सरकारांनी हे लॉकडाऊन संपूर्ण एप्रिलपर्यंत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी पंतप्रधानांशी झालेल्या बैठकीत अनेक मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लॉकडाऊन वाढवण्याबाबत सुचवले होते. पंजाबमध्ये आतापर्यंत कोरोनाचे एकूण 130 रुग्ण आढळले आहेत. यातील 4 जण पूर्णपणे बरे झाले आहेत, तर आतापर्यंत 10 लोकांचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी पंजाब सरकारने लॉक डाऊन वाढवण्याचे महत्वाचे पाऊल उचलले गेले आहे. पंजाबचे मुख्य कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर, शुक्रवारी 10 एप्रिल रोजी हा निर्णय घेतला. सोबतच पंजाब सरकारने कोरोना विषाणूच्या साथीला सामोरे जाण्यासाठी, मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी याबाबत माहिती दिली. आपल्या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘पंजाबमध्ये आता मास्क घालणे बंधनकारक असणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण कोणत्याही कामासाठी घरा बाहेर पडत असाल तर, आपणाला मास्क घालणे अनिर्वाय असणार आहे’.
सरकारचा विश्वास आहे की अशा काही उपायांनी कोरोना विषाणूचा प्रसार थांबविला जाऊ शकतो. आता 1 मे पर्यंत होणाऱ्या या लॉकडाऊन दरम्यान सरकार ऑनलाइन डिलिव्हरीद्वारे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करेल. दरम्यान, माध्यमांच्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुन्हा एकदा देशाला संबोधित करतील अशी शक्यता आहे व त्यामध्ये लॉक डाऊनबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्या 11 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील मुख्यमंत्र्यांसमवेत लॉकडाऊनबाबत चर्चा करणार आहेत.