LIC Share Drop: एलआयसीला GST विभागाकडून नोटीस, शेअर्समध्ये मोठी घसरण

एलआयसीला मिळालेल्या नोटीसचा फटका कंपनीच्या शेअर्सवर झाला आहे.

LIC (Photo Credits: Twitter)

भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला  (LIC) जीएसटी नोटिस (GST Notice) मिळाल्यानंतर त्यांच्या शेअर्समध्ये तब्बल दिड टक्क्यांहून अधिकची घसरण पहायला मिळाली. एलआयसी सोबतच वाहन उत्पादक कंपनी आयशर मोटर्स यांना जीएसटी नोटिसा मिळाल्या आहेत. यामध्ये GST कमी भरल्यामुळे 2017-18 या आर्थिक वर्षासाठी LIC ला 806 कोटी रुपयांची GST नोटीस पाठवण्यात आली होती. तर जीएसटीशी संबंधित तीन वेगवेगळ्या कारणांसाठी आयशर मोटर्सला 130 कोटी रुपयांहून अधिकची नोटीस बजावण्यात आली. (हेही वाचा - LIC In Top Life Insurance Company: एलआयसी ठरली जगातील चौथी सर्वात मोठी विमा कंपनी; जाणून घ्या पहिल्या तीन कंपन्या)

या GST नोटिसीचा कंपनीच्या आर्थिक किंवा इतर कोणत्याही कामांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे एलआयसीने म्हटले आहे.  एलआयसीला मिळालेल्या नोटीसचा फटका कंपनीच्या शेअर्सवर झाला आहे. आज 2 जानेवारी रोजी एलआयसीचे शेअर 856.2 रुपयांनी खुले झाले होते. मात्र काही वेळातच दीड टक्क्यांहून अधिकची घसरण शेअर्समध्ये पाहायला मिळाली.

जीएसटीच्या नोटीसनुसार, 365.03 कोटी रुपयांचा जीएसटी, 404.7 कोटी रुपयांचा दंड आणि 36.5 कोटी रुपयांच्या व्याजाचा समावेश आहे. या नोटिशीच्या विरोधात अपील करणार असल्याचे एलआयसीने म्हटले आहे. याआधीही ऑक्टोबरमध्ये एलआयसीला 84 कोटी रुपये आणि सप्टेंबरमध्ये 290 कोटी रुपयांच्या आयकर दंडाच्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या.