Lav Kush Ramlila: अतिशय खास असेल यंदाची रामलीला; बॉलिवूड स्टार्ससोबत 3 केंद्रीय मंत्री करणार अभिनय, रावण दहनसाठी Prabhas ला निमंत्रण

तीन कॅबिनेट मंत्रीही रामलीलाचा भाग असणार आहेत.

Representational Image (Photo Credits: PTI)

यंदा 5 ऑक्टोबर रोजी देशभरात दसऱ्याचा (Dussehra 2022) सण साजरा केला जाणार आहे. हिंदूंसाठी या सणाला खूप महत्त्व आहे. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जाणारा हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावेळी ठिकठिकाणी रामलीलाही आयोजित केली जाते, जिथे रावण दहनाचा कार्यक्रम होतो. दिल्लीमध्ये लवकुश रामलीला (Lav Kush Ramlila) समितीद्वारा आयोजित रामलीला विशेष लोकप्रिय आहे. यावेळी देशाच्या राजधानीत ही रामलीला मोठ्या थाटामाटात साजरी करण्याची तयारी सुरू आहे.

या रामलीलामध्ये यावेळी कॅबिनेट मंत्री आणि बॉलिवूड-टीव्ही कलाकार एकत्र दिसणार आहेत. मंत्री आणि कलाकार मिळून 10 दिवस चालणाऱ्या रामलीलामध्ये रामाची कथा जिवंत करण्याचा प्रयत्न करतील. यावेळी प्रेक्षकांना आतापर्यंतचा सर्वात मोठा स्टेज देखील पाहायला मिळणार आहे. 26 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या रामलीलाच्या आयोजकांनी यंदाची रामलीला पूर्वीपेक्षा मोठी करण्याचे आश्वासन दिले आहे.

ही शहरातील सर्वात भव्य रामलीला ठरणार असल्याचे मानले जात आहे. लाल किल्ला मैदानावरील ही रामलीला 26 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि दसऱ्याला संपेल. यावेळी बाहुबली फेम अभिनेता प्रभास दसऱ्याला रावणाचा पुतळा जाळताना दिसणार आहे. तसे निमंत्रण प्रभासला पाठवण्यात आले आहे.

लवकुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन कुमार म्हणाले की, समिती रामलीला साइटवर 'कर्तव्य पथ'चे मॉडेलही तयार करेल. यासोबतच भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मैदान 75 तिरंग्यांनी सजवण्यात येणार आहे. रामलीला मैदानाच्या मुख्य गेटवर भगवान रामाचे चित्र असेल, ज्याला 'राम द्वार' असे नाव देण्यात आले आहे. त्याचवेळी दुसऱ्या गेटला 'नेताजी सुभाषचंद्र बोस द्वार' असे संबोधण्यात येईल. जमिनीत 180X60 फूटाचे तीन मजली प्लॅटफॉर्म तयार केले जाईल, ज्याच्या वर एक मोठे राम मंदिर बांधले जाईल. रामलीलाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा स्टेज असेल.

अर्जुन कुमार यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही रामलीलामध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. तीन कॅबिनेट मंत्रीही रामलीलाचा भाग असणार आहेत. यामध्ये अश्विनी कुमार चौबे हे ऋषी वशिष्ठ, फग्गनसिंग कुलस्ते हे ऋषी अगस्त्यांची भूमिका साकारतील तर, अर्जुन राम मेघवाल हे भजन गाणार आहेत. त्याचबरोबर केवटची भूमिका ईशान्य दिल्लीतील भाजपचे आमदार मनोज तिवारी साकारणार आहेत. (हेही वाचा: 26 सप्टेंबरला घटस्थापना; जाणून यंदा नवरात्रीमध्ये ललिता पंचमी, महाअ‍ष्टमी चा दिवस कधी?)

कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर, ज्येष्ठ अभिनेते असरानी नारदांची भूमिका साकारणार आहेत. 'संकटमोचन महाबली हनुमान' या शोमध्ये हनुमानाची भूमिका करणारे टीव्ही अभिनेते वाधवा, त्यांची ही भूमिका पुन्हा साकारणार आहेत. अखिलेंद्र मिश्रा हे रावणाची भूमिका साकारतील. मुंबईस्थित मेकअप आर्टिस्ट विष्णू पाटील हे रामलीलेसाठी दिल्लीत येणार आहेत. कलाकारांचे कपडेही बॉलीवूडच्या फॅशन डिझायनरकडून डिझाइन केले जातील.