Largest Hanuman Temple: झारखंडच्या जामतारा येथे बांधले जाणार भारतातील सर्वात मोठे हनुमान मंदिर; काँग्रेस आमदार Irfan Ansari यांची घोषणा

इरफानच्या म्हणण्यानुसार, भाजपच्या पापाचे भांडे पूर्णपणे भरले आहे, कदाचित यामुळेच जनतेने भाजपला साथ दिली नाही. इरफान अन्सारी म्हणाले की, कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचे सर्व श्रेय भगवान बजरंगबलीला जाते.

Lord Hanuman (Photo Credit - File Image)

झारखंडमधील (Jharkhand) काँग्रेसचे (Congress) निलंबित आमदार इरफान अन्सारी (Irfan Ansari) यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील जामतारा येथे देशातील सर्वात मोठे हनुमान मंदिर (Largest Hanuman Temple) बांधण्याची घोषणा केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या नुकत्याच झालेल्या विजयानंतर त्यांनी ही घोषणा केली. भगवान हनुमान कर्नाटक निवडणूक प्रचारादरम्यान चर्चेत होते, कारण भाजपने मतदारांना मतदान करताना हनुमानाच्या नावाचा जप करण्याचे आवाहन केले होते.

याची सुरुवात काँग्रेसच्या जाहीरनाम्यापासून झाली होती, ज्यामध्ये पक्षाने राज्यात सत्तेवर आल्यास पीएफआय आणि बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले होते. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपने काँग्रेस पक्ष हनुमानाच्या भक्तांच्या विरोधात असल्याचा आरोप केला होता.

आता अन्सारी म्हणाले की, कर्नाटक राज्यातील निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या विजयानंतर भगवान हनुमानावरील त्यांची श्रद्धा वाढली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी घराजवळील हनुमान मंदिरात पूजाही केली. झारखंडमधील जेएमएमच्या नेतृत्वाखालील आघाडी पाडण्याचा कट रचल्याबद्दल काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांच्यासह इतर दोघांना पक्षाने निलंबित केले होते. त्यांना कोलकाता येथे पक्षाच्या दोन आमदारांसह 50 लाखांच्या रोख रकमेसह अटक करण्यात आली होती.

मंदिर बांधायला गरज पडल्यास आपण आपली किडनीदेखील विकायला तयार असल्याचे आमदार म्हणाले. इरफानच्या म्हणण्यानुसार, भाजपच्या पापाचे भांडे पूर्णपणे भरले आहे, कदाचित यामुळेच जनतेने भाजपला साथ दिली नाही. इरफान अन्सारी म्हणाले की, कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचे सर्व श्रेय भगवान बजरंगबलीला जाते. हनुमानजींना घेऊनच काँग्रेस पक्ष पुढे जाईल. 2024 च्या निवडणुकीत देखील काँग्रेसला भगवान बजरंगबलीचा आशीर्वाद मिळेल. यानंतर देशात काँग्रेसचा झेंडा फडकेल. (हेही वाचा: Tungnath Temple: जगातील सर्वात उंच शिवमंदिर 'तुंगनाथ धाम' 6 ते 10 अंशांनी झुकले; ASI च्या अहवालात झाला खुलासा)

दरम्यान, कर्नाटक निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात बजरंगबलीचा उल्लेख केला होता. यानंतर भाजपचे इतर नेतेही निवडणुकीत बजरंगबलीचे नाव घेताना दिसले. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने 135 जागांवर जोरदार विजय मिळवला आहे. त्याचबरोबर भाजप दुसऱ्या क्रमांकावर आणि जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर आहे.