Kedarnath Dham: केदारनाथ येथे Reels, Video बनवणाऱ्यांनो सावध, होऊ शकते कारवाई; व्हायरल 'प्रपोजल' व्हिडिओनंतर मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय

हा व्हिडीओ व्हायरल होताच भाविकांनी त्याचा निषेध केला. या व्हिडिओनंतरच केदारनाथ मंदिर समितीने रील आणि यूट्यूब व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक पोलिसांकडे केली.

Kedarnath Dham

देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उत्तराखंडचे केदारनाथ धाम (Kedarnath Dham) हे अतिशय लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. भगवान शंकराचे रूप पाहण्यासाठी लांबून लोक इथे येतात. पण, सध्या केदारनाथ धाम इतर काही कारणांमुळे चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे येथे येऊन रील्स (Reels) आणि यूट्यूब व्हिडिओ बनवणारे तरुण. नुकतेच काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यानंतर केदारनाथ धाम मंदिर समितीने स्थानिक पोलिसांकडे अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रीलमुळे समितीने कारवाईची मागणी केली.

ताजे प्रकरण 2 जूनचे आहे. केदारनाथ येथील रील्सला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये मंदिर परिसरात एक मुलगी एका मुलाला प्रपोज करताना दिसत आहे. ही रील व्हायरल होताच त्याविरोधात निदर्शने सुरू झाली. अनेकांनी केदारनाथ मंदिर परिसरात फोन्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. इथे रील्स बनवणाऱ्या लोकांमुळे मंदिराचे पावित्र्य बिघडत असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे.

2 जूनला विशाखा नावाच्या मुलीने तिच्या प्रियकराला अंगठी घेऊन गुडघ्यावर बसून प्रपोज केले होते. हा व्हिडीओ व्हायरल होताच भाविकांनी त्याचा निषेध केला. या व्हिडिओनंतरच केदारनाथ मंदिर समितीने रील आणि यूट्यूब व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक पोलिसांकडे केली. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने पोलिसांना पत्र लिहून मंदिर परिसरात व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कडक नजर ठेवण्याची विनंती केली आहे. लोक व्हिडिओ/रील बनवल्यामुळे देश-विदेशातील भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे समितीचे म्हणणे आहे. (हेही वाचा: Chardham Yatra Update: चारधाम यात्रेला हवामानाचा फटका, केदारनाथ-बद्रीनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाल्याने यात्रेकरूंना श्रीनगरमध्ये थांबवले)

याआधी केदारनाथच्या गर्भगृहात एक महिलेने पैसे उडवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ही महिला दर्शनासाठी आली होती. मंदिरात जाताच तिने शिवलिंगावर चलनी नोटांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. महिलेवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. गर्भगृहात व्हिडीओग्राफीला बंदी असताना महिलेने नोट उडवत व्हिडिओ बनवला. महत्वाचे म्हणजे त्या वेळी तिथे पुजारीही उपस्थित होते मात्र कोणीही महिलेला रोखले नाही.