Karnataka Shocker: कर्नाटकमध्ये डॉक्टरने केले सुमारे 900 बेकायदेशीर गर्भपात; बेंगळुरू पोलिसांकडून अटक

या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर संशयितांना अटक करण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Arrest (PC -Pixabay)

कर्नाटकातील (Karnataka) बेंगळुरूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांत सुमारे 900 बेकायदेशीर गर्भपात (Illegal Abortions) केल्याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी एक डॉक्टर आणि त्याच्या मदतनीसाला अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉ. चंदन बल्लाळ आणि त्याचा प्रयोगशाळा तंत्रज्ञ निसार यांनी म्हैसूर जिल्हा मुख्यालयातील रुग्णालयात जवळजवळ 900 गर्भपात केले आणि या केलेल्या प्रत्येक गर्भपातासाठी 30,000 रुपये आकारले. या प्रकरणी हॉस्पिटल मॅनेजर मीना आणि रिसेप्शनिस्ट रिझमा खान यांना या महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.

गेल्या महिन्यात, पोलिसांनी म्हैसूरजवळील मंड्या येथील जिल्हा मुख्यालयात लिंग निर्धारण आणि स्त्री भ्रूण हत्येच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आणि दोन आरोपी शिवलिंगे गौडा आणि नयन कुमार यांना अटक केली. यावेळी ते एका गर्भवती महिलेला कारमधून गर्भपातासाठी घेऊन जात होते.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान या दोन्ही आरोपींनी उघड केले की मंड्यातील गूळ उत्पादन युनिट अल्ट्रासाऊंड केंद्र म्हणून वापरले जात होते. त्यानंतरच्या तपासात तेथून पोलीस पथकाने स्कॅन मशीन जप्त केले आणि त्यासाठी कोणतेही वैध प्रमाणपत्र किंवा इतर अधिकृत कागदपत्रे आढळले नाहीत. संशयितांकडेही मशीनबाबत कोणतीही कागदपत्रे नव्हती. मशिनची नोंदणी केवळ डॉक्टरांच्या नावावरच होऊ शकते. अशी मशिन नोंदणीकृत क्रमांकासह येत असताना, त्यावरील स्टिकर काढल्याचे पोलिसांना आढळले. (हेही वाचा: Madhya Pradesh Shocker: ग्वाल्हेरमध्ये 17 वर्षीय तरुणीचे फेसबुक फ्रेंडकडून अपहरण; पीडितेवर सामूहिक बलात्कार, आरोपीला अटक)

पुढे प्राथमिक तपासात 'डॉ. चंदन बल्लाळ आणि डॉ. तुळशीरामची नावे समोर आली. डॉ. तुळशीरामची आई गर्भपात करायची. त्यानंतर तुळशीरामने एक साईड बिझनेस म्हणून स्वतः गर्भपात करायला सुरुवात केली. यासाठी बल्लाळशी हातमिळवणी केली. तपासात समोर आले आहे की, आरोपी डॉक्टरने गेल्या तीन वर्षांत त्याच्या साथीदारांच्या मदतीने म्हैसूर रुग्णालयात सुमारे 900 अवैध गर्भपात केले. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर संशयितांना अटक करण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.