लॉक डाऊनचा नियम धाब्यावर; कलबुर्गी जिल्ह्यात सिद्धलिंगेश्वर धार्मिक कार्यक्रमासाठी शेकडो लोक एकत्र (Video)

दरम्यान, कर्नाटक (Karnataka) राज्यातील कलबुर्गी (Kalburgi) जिल्ह्यात लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याची घटना समोर आली आहे

Hundreds of people participated in Siddhalingeshwara Chariot festival in Kalburgi (Photo Credits: ANI)

भारतात कोरोना व्हायरसची (Coronavirus) प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन (Lockdown) आहे. दरम्यान, कर्नाटक (Karnataka) राज्यातील कलबुर्गी (Kalburgi) जिल्ह्यात लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याची घटना समोर आली आहे. इथल्या चित्तपूर (Chittapur) येथे एका  धार्मिक कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचा फज्जा उडवत मोठ्या संख्येने लोक एकत्र आले होते. चित्तपूरमध्ये दरवर्षी भरला जाणारा सिद्धलिंगेश्वर (Siddhalingeshwara) धार्मिक मेळावा, सध्याच्या कठीण काळातही लॉकडाऊन असूनही घेण्यात आला. या मेळाव्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.

याठिकाणी अनेक लोक रथ ओढताना दिसले. दरम्यान, येथील स्थानिक भाजप नेत्याने या कार्यक्रमाचे पूर्ण समर्थन केले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब पोलिस घटनास्थळी पोहचले. मात्र तिथला भाजप नेता म्हणाला, ‘राज्यात आमचे सरकार आहे आणि मी इथला स्थानिक नेता आहे. म्हणून, इथे कोणी कुणाला स्पर्श करू शकत नाही.’ हे उत्तर ऐकल्यानंतर पोलिसांनीही बघ्याची भूमिका घेतली. याआधी मार्चमध्ये कलबुर्गी येथील भाजी मार्केटमध्ये शेकडो लोक जमा झाले होते आणि त्यावेळी कोणतेही नियम पाळले गेले नाहीत. (हेही वाचा: लॉक डाऊन मोडून बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी एकत्र आले शेकडो लोक; पोलिसांकडून FIR दाखल)

या मेळाव्यासाठी जमा झालेल्या बऱ्याच लोकांनी मास्क लावला नव्हता का चेहरा कव्हर केला नव्हता. कलबुर्गी जिल्हा कोरोनाच्या हॉटस्पॉट्समध्ये समाविष्ट आहे आणि कोरोनाचे बरेच रुग्ण येथे आढळले आहेत. आता या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांवर एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तसेच लॉकडाऊन असूनही शेकडो लोक जमा झाले, या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. तसेच मंदिर व्यवस्थापनाविरूद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 188, 143, 269 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे व या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.