कर्नाटकमध्ये पेट्रोल, डिझेल दरात २ रुपयांची कपात
इंधन दरातील ही कपात म्हणजे पंतप्रधान मोदींसाठी वाढदिवसाची भेट असल्याची टोलेबाजी काँग्रेसने केली आहे.
बंगळुरु: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज (सोमवार, १७ सप्टेंबर) वाढदिवस. देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांना भेटवस्तू दिल्या जात आहेत. दरम्यान, कर्नाटक सरकारनेही आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक अनोखा निर्णय घेतला आहे. देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत असताना कर्नाटकने मात्र, पेट्रोल-डिझेलच्या दरात २ रुपयांची कपात केली आहे. इंधन दरातील ही कपात म्हणजे पंतप्रधान मोदींसाठी वाढदिवसाची भेट असल्याची टोलेबाजी काँग्रेसने केली आहे.
'केंद्र सरकारला हे का जमत नाही?'
राज्यात पेट्रोल-डिझेल दरात २ रुपयांची कपात करत असल्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज केली. सरकारच्या या निर्णयामुळे कर्नाटकच्या जनतेला मोठा दिलासा मिळण्या मदत झाली आहे. जनहित ध्यानात घेऊनच आपण हा निर्णय घेतल्याचे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. मात्र, कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांच्यासोबत सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसने मात्र, या निर्णयावरून बाजपला चांगल्या टपल्या मारल्या आहेत. कर्नाटकमध्ये आमच्या सरकारने पेट्रोल-डिझेलमध्ये कपात करण्याचा निर्णाय घेतला. हा निर्णय म्हणजे पंतप्रधानांना वाढदिवसाची दिलेली भेट आहे, असे कांग्रेसने म्हटले आहे. दरम्यान, 'जर राज्य सरकार इंधन दर कमी करू शकते तर केंद्र सरकार इंधन दरात कपात का करत नाही?,' असा सवाल काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष दिनेश राव यांनी केला आहे.
महाराष्ट्रातही पेट्रोल-डिजेलच्या दरांचा भडका
दरम्यान, महाराष्ट्रातही पेट्रोल-डिजेलच्या दरांचा भडका उडाला आहे. हे दर प्रतिदिन वाढीचे नवनवे उच्चांक गाठत आहे. इंधनातील दरवाढ आणि पर्यायाने महागाईत होणारी मॅरेथॉन वाढ पाहून जनता मात्र हैराण झाली आहे. राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात तर कहरच झाला. येथे पेट्रोल चक्क प्रतिलीटर ९२.१९ पैशांवर पोहोचले आहे. तर, परभणीत ९१.२२ असा पेट्रोलचा दर आहे.