मॉब लिंचिंग विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणाऱ्या 49 बॉलिवूड सेलिब्रिटींना 61 सेलिब्रिटींकडून प्रत्युत्तर
यावर बॉलिवूडमधील तब्बल 61 सेलिब्रिटींनीच पत्राचा समाचार घेत प्रतित्तुर दिले आहे.
देशात सातत्याने घडत असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटना रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील 49 मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिले. तसंच या प्रकरणी ठोस पाऊल उचलण्यात यावी, यासह विविध मागण्या पत्रात करण्यात आल्या होत्या. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना बॉलिवूडमधील तब्बल 61 सेलिब्रिटींनीच या पत्राचा समाचार घेत प्रतित्तुर दिले आहे. हे पत्र लिहिणाऱ्यांमध्ये अभिनेत्री कंगना रनौत, गीतकार प्रसून जोशी, क्लासिकल डान्सर आणि खासदार सोनल मानसिंह, वाद्य पंडित विश्वमोहन भट्ट, दिग्दर्शक मधूर भंडारकर आणि विवेक अग्निहोत्री यांच्यासह अनेक सेलिब्रेटींचा समावेश आहे. (मॉब लिंचिंग विरोधात अनुराग कश्यप, अपर्णा सेन यांच्यासह 49 बॉलिवूड दिग्गजांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र)
नक्षलवादी आदिवासींना लक्ष्य करतात तेव्हा हे लोक शांत का राहतात?, काश्मीरमध्ये फुटीरतावादी शाळा बंद केल्या तेव्हा हे लोक काय करत होते? तसंच देशाचे तुकडे होतील अशी घोषणा देण्यात आली तेव्हा तुम्ही तुमचं म्हणणं का मांडलं नाही, असे प्रश्न या पत्रात विचारण्यात आले आहेत. त्यासोबतच जेएनयूमध्ये करण्यात आलेल्या घोषणाबाजीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.
ANI ट्विट:
श्रीराम म्हणण्याची होणारी सक्ती आणि मॉब लिंचिग विरोधात रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप, शुभा मुद्गल, अपर्णा सेन, कोंकणा सेन शर्मा यांच्यासहल 49 बॉलिवूड सेलिब्रेटींनी मोदींना पत्र लिहीत आपला निषेध व्यक्त केला होता.
तसंच या घटना रोखण्यासाठी कायदा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. तसंच मॉब लिंचिंगची आकडेवारी धक्कादायक असल्याचे सांगत आपले संविधान धर्मनिरपेक्ष असून देशात लोकशाही आणि प्रजासत्ताक व्यवस्था आहे. त्यामुळे कोणत्याही जाती, धर्म आणि वंशाच्या नागरिकाला समान अधिकार आहेत, असेही पत्रात म्हणण्यात आले होते.
या पत्रावर बॉलिवूड सेलिब्रेटींकडूनच उत्तर मिळाल्याने पुढे हे प्रकरण काय वळण घेतं, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.