चालत्या ट्रेनमध्ये चक्क अंडरवेअरवर फिरताना आढळले JDU आमदार Gopal Mandal; ट्रोल झाल्यानंतर दिले 'हे' स्पष्टीकरण
गोपाल मंडल पुढे म्हणाले की, त्यांनी इतर प्रवाशांची माफी मागितली आहे. मात्र जे घडले त्यामध्ये माझा दोष नव्हता असेही ते म्हणाले आहेत
बिहारमधील सत्ताधारी पक्ष जनता दल युनायटेडचे (JDU) आमदार गोपाल मंडल (Gopal Mandal) यांचे एक अत्यंत लाजिरवाणे कृत्य समोर आले आहे. यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राजेंद्र नगर (पाटणा) ते नवी दिल्ली अशा 02309 तेजस राजधानी एक्सप्रेसमध्ये गोपाल मंडल प्रवास करत होते, या दरम्यान, ते कपडे काढून चक्क चड्डी आणि बनियानमध्ये फिरताना आढळले. गोपाल मंडल यांना अशा स्थितीत पाहून डब्यात उपस्थित असलेल्या अन्य प्रवाशांनी यावर आक्षेप घेतला आणि त्यांना कपडे घालायला सांगितले.
मात्र या जेडीयू आमदारांनी प्रवाशांनाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाढता वाद पाहून तेथे उपस्थित असलेल्या आरपीएफ टीमने प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मीडिया रिपोर्टनुसार, आरपीएफ जवानाने सांगितले की ही घटना दिलदारनगर स्टेशनजवळ घडली. या घटनेनंतर आमदार प्रचंड ट्रोल झाले होते.
आता चालत्या ट्रेनमध्ये घडलेल्या घटनेबद्दल भागलपूरमधील गोपालपूरचे आमदार गोपाल मंडल यांनी सांगितले की, राजधानी तेजस एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या घटनेबद्दल त्यांना खेद आहे. गोपाल मंडल पुढे म्हणाले की, त्यांनी इतर प्रवाशांची माफी मागितली आहे. मात्र जे घडले त्यामध्ये माझा दोष नव्हता असेही ते म्हणाले आहेत. आपले पोट अस्वस्थ होते, ज्यामुळे आपल्याला घाईघाईने वॉशरूमसाठी जावे लागले. म्हणून कपडे घालता आले नाहीत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.’
जदयूचे आमदार गोपाल मंडल यांनी सांगितले की, ज्यावेळी ते वॉशरूममधून चड्डी आणि बनियान घालून येत होते, त्यावेळी तेथे एकही महिला नव्हती. याच्याशी संबंधित चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. (हेही वाचा: Greater Noida Murder Case: ऑर्डर देण्यास विलंब केल्याने डिलिव्हरी बॉयने केली हॉटेल मालकाची हत्या, आरोपींचा शोध सुरू)
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पाटणा-नवी दिल्ली तेजस राजधानी एक्सप्रेसच्या ए-1 डब्यात जेडीयूच्या भागलपूर जिल्ह्यातील गोपालपूर विधानसभेचे आमदार नरेंद्र कुमार नीरज उर्फ गोपाल मंडल यांना प्रवाशांच्या विरोधाला आणि रोषाला सामोरे जावे लागले. ट्रेन पाटणाहून निघताच आमदारांनी कपडे काढून रे फक्त अंडरवेअरवर शौचालयाच्या दिशेने जाऊ लागले.