Jan Samarth Portal: आता कर्ज घेण्यास येणार नाही कोणतीही अडचण, पीएम नरेंद्र मोदींनी सुरू केले जन समर्थ पोर्टल, 13 सरकारी योजना एकाच व्यासपीठावर उपलब्ध
प्रथम तुम्ही तुमची पात्रता तपासा, ऑनलाइन अर्ज करा, ऑफर पहा आणि तुम्हाला निवडलेल्या बँकेकडून डिजिटल मान्यता मिळेल. प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळी कागदपत्रे आवश्यक आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी दिल्लीत अर्थ मंत्रालयाच्या एका कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी त्यांनी क्रेडिट-लिंक्ड सरकारी योजनांसाठी 'जन समर्थ पोर्टल' (Jan Samarth Portal) सुरू केले. जन समर्थ पोर्टल सोमवारी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे वित्त मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या 'आयकॉनिक वीक सेलिब्रेशन' दरम्यान सुरू करण्यात आले. हे पोर्टल एकाच व्यासपीठावर विविध सरकारी योजना प्रदान करेल. तसेच हे एक असे डिजिटल पोर्टल आहे जे सरकारी क्रेडिट योजना एकत्र आणते. या सोबतच हे अशा प्रकारचे पहिले पोर्टल असेल जे कर्जदारांना कर्ज देणाऱ्या लोकांशी जोडेल.
पंतप्रधानांनी वित्त मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आयकॉनिक वीक सोहळ्याचे उद्घाटन केले. आझादीच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून मंत्रालय 6 ते 11 जून दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. जन समर्थ पोर्टलचा मुख्य उद्देश सर्व योजना एका व्यासपीठावर आणणे आणि त्याचा लाभ नागरिकांना देणे हा आहे. हे पोर्टल सर्व जोडलेल्या योजनांचे कव्हरेज सुनिश्चित करते. केंद्र सरकारच्या 4 कर्ज श्रेणीतील 13 योजना जन समर्थ पोर्टलवर उपलब्ध असतील. विशेष बाब म्हणजे या प्लॅटफॉर्मवर 125 हून अधिक कर्जदाते उपलब्ध आहेत.
जनसमर्थ पोर्टलद्वारे कर्जासाठी अर्ज करण्यापासून ते मंजुरीपर्यंतची सर्व कामे ऑनलाइन केली जातील. पोर्टलद्वारे तुम्ही तुमच्या कर्जाची स्थिती देखील तपासू शकाल. याशिवाय, जर कर्ज उपलब्ध नसेल, तर तुम्ही या पोर्टलद्वारे ऑनलाइन तक्रार देखील करू शकता. यासह, तक्रारीचा निपटारा 3 दिवसात केला जाईल. (हेही वाचा: LIC at New Low: एलआयसी समभागांची घसरगुंडी थांबेचना, गुंतवणूकदारांची चिंता वाढली)
जन समर्थ पोर्टलवर सध्या 4 कर्ज श्रेणी आहेत आणि प्रत्येक कर्ज श्रेणीमध्ये अनेक योजनांचा समावेश आहे. या पोर्टलवर कोणीही कर्जासाठी अर्ज करू शकतो. मात्र, यासाठी, प्रथम तुम्हाला तुमच्या गरजेच्या कर्ज श्रेणीतील पात्रता तपासावी लागेल. त्यानंतर पात्र अर्जदार ऑनलाइन अर्ज प्रक्रियेद्वारे कर्जासाठी अर्ज करू शकतात. या ठिकाणी शैक्षणिक कर्जासाठी 3 योजना उपलब्ध आहेत जिथे तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि पात्रतेनुसार अर्ज करू शकता. कृषी पायाभूत सुविधा कर्जासाठी 3 योजना आहेत. व्यवसाय कर्जासाठी 6 योजना आहेत यासोबतच उपजीविका कर्जासाठीदेखील काही योजना उपलब्ध आहेत.
अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. प्रथम तुम्ही तुमची पात्रता तपासा, ऑनलाइन अर्ज करा, ऑफर पहा आणि तुम्हाला निवडलेल्या बँकेकडून डिजिटल मान्यता मिळेल. प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळी कागदपत्रे आवश्यक आहेत. पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये आधार क्रमांक, मतदार ओळखपत्र, पॅन, बँक स्टेटमेंट इ. गोष्टींचा समावेश आहे.