Jalandhar: पत्रिकेतील 'मंगळ' घालवण्यासाठी शिक्षिकेने केले 13 वर्षांच्या विद्यार्थ्याशी लग्न; साजरी केली लग्नाची पहिली रात्र, तक्रार दाखल

लग्नाचे सर्व विधी पार पडले. त्यानंतर दोघेही पाच दिवस नवरा-बायकोसारखे राहिले. लग्नानंतर 5 दिवसांनी महिलेने पंडितच्या सांगण्यावरून विधवा झाल्याचे नाटक केले.

Representational Image (Photo Credit: Wikimedia Commons)

अंधश्रद्धा (Superstition) माणसाला कोणत्या थराला घेऊन जाऊ शकते याचे ताजे उदाहरण मंगळवारी जालंधर (Jalandhar) पोलिस स्टेशन बस्ती बावा खेल येथे पाहायला मिळाले. याठिकाणी एका शिक्षिकेच्या पत्रिकेत मंगळ दोष (Mangala Dosha) असल्याने तिच्या लग्नात वारंवार अडथळे येत होते. हे विघ्न दूर करण्यासाठी तिने एका पंडितच्या सांगण्यावरून चक्क एका 13 वर्षांच्या विद्यार्थ्याशी जबरदस्तीने लग्न केले. या मुलाला तिने व तिच्या कुटुंबीयांनी 6 दिवस आपल्या घरात डांबून ठेवले व त्यानंतर सोडून दिले. अल्पवयीन विद्यार्थ्याच्या कुटूंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या कुटुंबाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बस्ती बावा खेल परिसरातील महिला शिक्षिकेचे लग्न होत नव्हते. लग्नातील व्यत्ययाचा दोष दूर करण्यासाठी या महिलेने तिच्या एका विद्यार्थ्याला आणि त्याच्या कुटूंबाला विश्वासात घेतले. शिक्षिकेचे विद्यार्थ्याला ट्युशनच्या आमिषाने 6 दिवस आपल्या घरी ठेऊन घेतले. हा विद्यार्थी शिक्षिकेच्या घरी असल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली असली तरी, ती महिला आणि तिचे कुटुंबीय याबाबत कोणत्या प्रकारचा कट रचत आहेत हे मुलाच्या कुटुंबाला माहित नव्हते.

जेव्हा हा विद्यार्थी शिक्षिकेच्या घरी पोहोचला तेव्हा या दोघांचे लग्न लावण्यात आले. लग्नाचे सर्व विधी पार पडले. त्यानंतर दोघेही पाच दिवस नवरा-बायकोसारखे राहिले. लग्नानंतर 5 दिवसांनी महिलेने पंडितच्या सांगण्यावरून विधवा झाल्याचे नाटक केले. आपल्या बांगड्या फोडल्या व घरात एक शोकसभा पार पडली. त्यानंतर ही महिला विधवा झाल्याचे सर्वांना सांगण्यात आले. या सर्व प्रकारानंतर विद्यार्थ्याला त्याच्या घरी पाठविण्यात आले. महिला शिक्षकाच्या कुटूंबाने आपल्याकडून बरीच कामे करवून घेतल्याचा आरोपही विद्यार्थ्याने केला आहे. तसेच लग्नाच्या पहिल्या रात्रीचे नाटक केल्याचेही विद्यार्थ्याने सांगितले. (हेही वाचा: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार; गुप्तधन मिळावे म्हणून सुशिक्षित कुटुंबाने दोन महिने सुनेला ठेवले उपाशी)

बस्ती बावा खेल पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर गगनदीप सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या पालकांनी तक्रार दाखल केली होती, परंतु नंतर दोन्ही पक्षामध्ये बोलणे झाल्यांनतर ही तक्रार मागे घेतली गेली.