Influencer Bobby Kataria Arrested: प्रसिद्ध इन्फ्लुएंसर आणि यूट्यूबर बॉबी कटारियाला अटक; मानवी तस्करीचा आरोप, जाणून घ्या सविस्तर

तक्रारीनंतर कटारिया व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Bobby Kataria (Photo Credit: ANI)

Influencer Bobby Kataria Arrested: अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला प्रसिद्ध यूट्यूबर बॉबी कटारियाला गुरुग्राम पोलिसांनी अटक केली आहे. बॉबीवर मानवी तस्करीचा आरोप ठेवण्यात आला आहे. परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली कटारिया याने दोघांची 4 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा दावा केला आहे. मूळचे फतेहपूरचे रहिवासी असलेले अरुण कुमार आणि उत्तर प्रदेशातील धौलाना येथील रहिवासी मनीष तोमर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. गुरुग्राम पश्चिम डीसीपी करण गोयल यांच्या म्हणण्यानुसार, बॉबी कटारियाने अरुण कुमार आणि मनीष तोमर या दोन तरुणांना यूएई आणि सिंगापूरमध्ये नोकरी मिळवून देण्याचे वचन दिले होते.

तक्रारीनुसार, पिडीतांनी इंस्टाग्रामवर परदेशात काम देण्यासंबंधीची जाहिरात पाहिली होती. कटारियाच्या अधिकृत अकाऊंटवरून इन्स्टाग्राम आणि यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही जाहिरात पोस्ट करण्यात आली होती. या कामाबाबत संपर्क साधण्यासाठी गुरुग्राममधील एका मॉलमध्ये असलेल्या कार्यालयात भेटण्यास सांगण्यात आले होते.

त्यानंतर तक्रारदाराने 1 फेब्रुवारी 2024 रोजी कटारिया याची त्याच्या कार्यालयात भेट घेतली आणि नोंदणीसाठी 2,000 रुपये दिले. त्यानंतर बॉबीच्या सांगण्यावरून तक्रारदरांनी अजून काही खात्यांमध्ये प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये पाठवले. पुढे बॉबीने तक्रारदार आणि त्याच्या मित्राला व्हिएन्टिन (लाओस) येथे पाठवले. हे दोघेही व्हिएंटियान विमानतळावर उतरल्यावर त्यांना अभि नावाचा माणूस भेटला. ज्याने स्वतःची बॉबी कटारियाचा मित्र आणि पाकिस्तानी एजंट अशी ओळख करून दिली.

त्यानंतर पीडितांना एका अज्ञात चिनी कंपनीकडे नेले. तेथे दोघांना बेदम मारहाण करून त्यांचे पासपोर्ट हिसकावून घेतले व त्यांना अमेरिकन नागरिकांविरुद्ध सायबर फसवणूक करण्यास भाग पाडले. सूचनेनुसार काम न केल्यास त्यांना भारतात परतता येणार नाही आणि त्यांना तिथेच मारले जाईल, अशी धमकीही दिली गेली. अखेर दोन्ही पिडीत कसेतरी तिथून पळाले आणि भारतीय दूतावास गाठला. त्यानंतर भारतात परत आल्यावर त्यांनी कटारियाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. (हेही वाचा: Dera Manager Murder Case: डेरा मॅनेजर हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीमसह इतर 4 जणांची निर्दोष मुक्तता)

पहा व्हिडिओ- 

फिर्यादीने पोलिसांना सांगितले की, बॉबी कटारिया सारख्या दलालांनी नोकरीच्या बहाण्याने महिलांसह सुमारे 150 भारतीयांना मानवी तस्करीच्या माध्यमातून त्या कंपनीत पाठवले होते. तक्रारीनंतर कटारिया व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कटारियाला सोमवारी संध्याकाळी त्याच्या गुरुग्राम कार्यालयातून अटक करण्यात आली. एनआयएने सोमवारी अनेक राज्यांमध्ये छापे टाकले आणि आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक रिंगमध्ये सहभागी असलेल्या पाच जणांना अटक केली. आरोपी भारतीय तरुणांना नोकरीचे खोटे आश्वासन देऊन परदेशात पाठवायचे.

बॉबी कटारियाने 2019 मध्ये फरिदाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकही लढवली आहे. मात्र, या निवडणुकीत त्याला केवळ 393 मते मिळवता आली. पाच वर्षांपूर्वी त्याने निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याची संपत्ती 12 लाख रुपये असल्याचे जाहीर केले होते. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या बॉबी कटारिया जवळपास 41 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. गुरुग्राममध्ये एका आलिशान घराशिवाय त्याच्याकडे महागड्या गाड्यांचा संग्रह असल्याचे सांगण्यात येत आहे.