India's Most Eligible: भारतामध्ये अजूनही लग्नासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना पसंती; Shaadi.com च्या सर्वेक्षणात समोर आली माहिती

वेबसाइटवर 60 वर्षांवरील 6500 सक्रिय सदस्य आहेत. वेबसाइटवर सर्वात वयस्कर महिलेचे 72 वर्षे आहे, तर सर्वात वयस्कर पुरुषाचे वय 79 वर्षे आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Wikimedia Commons)

सुखी जीवनासाठी, संसारासाठी चांगल्या जोडीदाराची साथ लाभणे फार महत्वाचे असते. म्हणूनच लग्न हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. प्रत्येकाच्याच आपल्या लाइफ पार्टनरकडून काही अपेक्षा असतात, ज्याच्या आधारे संपूर्ण आयुष्य गुण्या-गोविंदाने व्यतीत करता येईल. आता एका सर्वेक्षणामधून हे समोर आले आहे की, एखादा मुलगा किंवा मुलगी आपल्या जीवनसाथीमध्ये नेमके कोणते गुण शोधतात. प्रसिद्ध मॅट्रिमोनियल वेबसाइट Shaadi.comच्या ‘भारतातील मोस्ट एलिजिबल’ (India's Most Eligible) सर्व्हेचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे.

या सर्वेक्षणात संपूर्ण भारताचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महानगरे, लहान शहरे आणि ग्रामीण भागांचा समावेश आहे. तसेच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे स्त्री किंवा पुरुष यात समाविष्ट आहेत. या लोकांनी आपल्या जोडीदारामध्ये आपल्याला कोणते गुण हवेत याबाबत माहिती दिली आहे. हे सर्वेक्षण 1 डिसेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान करण्यात आले आहे. सर्वेक्षणात सुमारे 2.5 दशलक्ष वापरकर्ते सहभागी झाले होते, त्यापैकी 1.6 दशलक्ष महिला आणि 9 दशलक्ष पुरुष होते.

सर्वेक्षणातून असे दिसून आले की ‘आर्थिक स्वातंत्र्य’ हा पुरुष आणि महिला दोघांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वेक्षणानुसार सरकारी नोकऱ्यांमध्ये काम करणारे लोक हे 'सर्वाधिक पात्र सिंगल' आहेत. सर्वेक्षणानुसार, भारतातील लग्नासाठी सर्वात पात्र महिला या ‘कायदा अंमलबजावणी अधिकारी’ आहेत, तर सर्वात पात्र पुरुष हे ‘सिव्हिल सर्व्हिस’मध्ये काम करणारे तरुण आहेत. वार्षिक 30 लाख रुपये कमावणाऱ्या पुरुषांना 190% अधिक पसंती आहे, तर वार्षिक 30 लाख रुपये कमावणाऱ्या महिलांना 17% जास्त पसंती आहे.

नागरी सेवा आणि तंत्रज्ञान उद्योगात काम करणाऱ्या पुरुषांना इतर व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या पुरुषांपेक्षा जास्त पसंती आहे आणि विमानचालन व्यवसाय आणि वास्तुविशारद असलेल्या महिलांना जास्त पसंती आहे. नोकरदार महिला ही पुरुषांची पहिली पसंती आहे. कृषी उद्योगात काम करणाऱ्या पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही कमी पसंती आहे. (हेही वाचा: लग्नाच्या रिसेप्शनच्या काही तास आधी रक्ताच्या थारोळ्यात आढळले नवविवाहित जोडपे; शरीरावर 72 ठिकाणी चाकूच्या खुणा)

अहवालात असेही सुचवण्यात आले आहे की, 34-35 वयोगटातील पुरुषांना मॅच शोधणे कठीण जाते. वेबसाइटवर 60 वर्षांवरील 6500 सक्रिय सदस्य आहेत. वेबसाइटवर सर्वात वयस्कर महिलेचे 72 वर्षे आहे, तर सर्वात वयस्कर पुरुषाचे वय 79 वर्षे आहे. दरम्यान, shaadi.com ही एक विश्वासार्ह वैवाहिक वेबसाइट समजली जाते. ज्याचे आतापर्यंत 50 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत आणि 20 वर्षांपासून मॅच मेकिंगमध्ये आपण सर्वोत्तम काम करत असल्याचा दावा ही वेबसाईट करते.