भारतात सुरु होणार Medical Drone Delivery; 18 जून पासून ट्रायल्सला सुरुवात

beyond visual line of sight (BVLOS) चे परिक्षण 18 जून रोजी होणार आहे. याची पहिली चाचणी बंगलोर पासून 80 किमी दूर असलेल्या गौरीबिदानूर येथे होईल.

Drone | Representational Image | (Photo Credits: File Image)

भारतात लवकरच मेडिकल ड्रोन डिलिव्हरी ट्रायल्सला (Medical Drone Delivery Trials) सुरुवात होणार आहे. Beyond visual line of sight (BVLOS) चे परिक्षण 18 जून रोजी होणार आहे. याची पहिली चाचणी बंगलोर पासून 80 किमी दूर असलेल्या गौरीबिदानूर येथे होईल. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, बंगलोरच्या Throttle Aerospace Systems (TAS) यांनी सिव्हिल एव्हिएशनच्या डिरेक्टर जनरल यांची परवानगी मार्च 2020 मध्येच घेतली होती. परंतु, देशात चाललेल्या लॉकडाऊनमुळे इतर एजन्सीजकडून परवानगी मिळण्यास विलंब लागला.

आता सर्व एजन्सीजकडून परवानगी मिळाल्यानंतर या ड्रोनच्या पहिल्या ट्रायल्सला सुरुवात होईल. 18 जूनपासून सुरु होणाऱ्या या ट्रायल्स 35 ते 40 दिवसांपर्यंत चालतील. या चाचणीसाठी ट्रान्सपोर्ट करण्यात येणारी औषध नारायणा हेल्थ यांच्याकडून पुरवण्यात येतील. तर कार्डियाक सर्जन डॉ. देवी शेट्टी यांनी देखील यास पाठिंबा दर्शवला आहे.

सध्या अजून दोन संस्थांना मेडिकल ड्रोनचे प्रयोग करण्यास परवानगी मिळाली आहे. परंतु, ही चाचणी सुरु करणारी आमची पहिली संस्था असेल. याची सुरुवात आम्ही 2016 पासून केली होती. इतक्या वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर लवकरच संपूर्ण भारतभर कर्मिशियल ड्रोन डिलिव्हरी सुरु करण्याचा आमचा मानस आहे, असे TAS चे सीईओ नागेंद्रन कंदस्वामी यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. (Zomato लवकरच ड्रोनद्वारे करणार डिलिव्हरी; TechEagle कंपनीची खरेदी)

चाचणी दरम्यान ड्रोनचे दोन वेरिएंट वापरले जातील. MedCOPTER आणि RANDINT अशी या दोन वेरिएंटची नावं असतील. MedCOPTER हे छोटे वेरिएंट असून 1 किलो वजनाची औषधे 15 किमी पर्यंत नेऊ शकतो. तर दुसरे वेरिएंट 2 किलो वजनाची औषधे 12 किमी पर्यंत नेऊ शकतो. या चाचणी दरम्यान कमीत कमी 100 ते 125 तास ड्रोन उडवण्याचा मानस आहे, असे कंदस्वामी म्हणाले.

या ड्रोनद्वारे कोणत्या प्रकारची औषधे डिलिव्हर करु शकतो, यामध्ये कोणकोणते अडथळे येऊ शकतात आणि याचा वापर भविष्यात नियमितपणे करता येईल का, या बाबींसंदर्भात नारायणा हेल्थ आणि कंदस्वामी यांच्यामध्ये चर्चा झाली. आमच्या सॉफ्टवेअरला नारायणाने दिलेल्या ऑर्डरची माहिती मिळेल आणि सिस्टममध्ये नमूद केलेल्या अॅड्रेसनुसार ड्रोनद्वारे औषधांची डिलिव्हरी केली जाईल, असेही कंदस्वामी यांनी सांगितले.