India's First Cow Dung Paint: खादी इंडियाने सादर केले गायीच्या शेणापासून बनवलेले पेंट; मिळणार आठ फायदे
गाईच्या शेणापासून बनविलेले पेंट डिस्टेम्पर आणि प्लास्टिक इमल्शन या दोन रूपात आहे. त्याचबरोबर, हा पेंट बाजारात उपलब्ध असलेल्या पेंटपेक्षा खूपच स्वस्त असल्याचा दावा खादी इंडियाने केला आहे. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त चार तासांत सुकते
India's First Cow Dung Paintगाईच्या दुधाचे फायदे आपणा सर्वांना माहित आहेतच. गायीच्या शेणाचेही ग्रामीण भागात अनेक फायदे आहेत. गोमुत्रालाही हिंदू संस्कृतीमध्ये महत्व आहे. आता गायीच्या शेणापासून बनविलेले रंगही (Cow Dung Paint) बाजारात दाखल झाले आहेत. होय आपण आपले घर, कार्यालय किंवा दुकान ज्या रंगाने रंगविता तेच रंग आता गायीच्या शेणापासून बनविले आहेत. खादी इंडियाने (Khadi India) देशात पहिल्यांदाच असे शेणापासून बनवलेले रंग सादर केले आहेत. आज, मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या तर्फे हे पेंट लॉन्च करण्यात आले. हे रंग 'खादी नैसर्गिक पेंट' (Khadi Prakritik Paint) म्हणून सादर केले गेले. याला वैदिक पेंट असे नाव देण्यात आले आहे.
खादी व ग्रामोद्योग आयोगाने याची निर्मिती केली आहे. गाईच्या शेणापासून बनविलेले पेंट डिस्टेम्पर आणि प्लास्टिक इमल्शन या दोन रूपात आहे. त्याचबरोबर, हा पेंट बाजारात उपलब्ध असलेल्या पेंटपेक्षा खूपच स्वस्त असल्याचा दावा खादी इंडियाने केला आहे. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त चार तासांत सुकते तसेच त्यामध्ये गरजेनुसार रंग देखील घातले जाऊ शकतात. या खादी पेंटमध्ये शिसे, पारा, क्रोमियम आर्सेनिक कार्डियम सारखे जड धातू नाहीत. खादी इंडियाच्या म्हणण्यानुसार या पेंटचे अष्टलाभ म्हणजेच आठ फायदे आहेत. हा पेंट इको फ्रेंडली, विना विषारी, अँटी बॅक्टेरियल्स, अँटी फंगल, गंधहीन, हेवी मेटल फ्री, नैसर्गिक इन्सुलेटर आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार शेणापासून बनविलेल्या पेंटमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त फायदा होणार आहे. हा पेंट लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. त्याचे पॅकिंग 2 लिटरपासून 30 लिटरपर्यंत तयार केले जाईल. त्याचबरोबर खादी इंडियाच्या मते त्याची किंमतही अगदी कमी आहे. एक लिटर डिस्टेम्पर 120/- रुपये, तर इमल्शन 225/- रुपये प्रति लिटर आहे. लोकांना हे तंत्रज्ञान शिकवण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे, जेणेकरून अधिकाधिक लोक त्यास पुढे नेतील. सरकारला आशा आहे की असे झाल्यास 6 हजार कोटींपेक्षा जास्त मोठा उद्योग तयार होईल आणि ग्रामीण भागातील रहिवासी आणि शेतकरी यांचा फायदा होईल. (हेही वाचा: पोस्ट ऑफिस च्या सुकन्या समृद्धी योजनेचे बंद पडलेले खाते पुन्हा कसे सुरु कराल? जाणून घ्या सोपी पद्धत)
या पेंटमुळे स्थानिक उत्पादकांना चालना मिळेल आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे खादी व ग्रामोद्योग आयोगाचे म्हणणे आहे. गोशाळांचे उत्पन्न वाढविण्यातही याची महत्त्वपूर्ण भूमिका असेल.