विंग कमांडरच्या वडिलांचे भावुक वक्तव्य- 'अभिनंदन'च्या शौर्याचा अभिमान आहे; तो सुखरुप परत यावा हीच प्रार्थना

पुलावामा दहशतवादी हल्ल्याचे उत्तर देण्यासाठी भारतीय वायुसेनेने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या तीन विमानांनी पाक सीमा ओलांडत भारताच्या हद्दीत प्रवेश केला.

Representational Image |(File Photo: IANS)

पुलावामा दहशतवादी हल्ल्याचे उत्तर देण्यासाठी भारतीय वायुसेनेने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या तीन विमानांनी पाक सीमा ओलांडत भारताच्या हद्दीत प्रवेश केला. मात्र भारतीय वायुसेनेच्या सतर्कता आणि चतुराई पाहुन या विमानांनी पळ काढला. यात पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडण्यात भारताला यश आले. मात्र भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमानला पाकिस्तानी सेनेने पकडले. आता देशभरातून अभिनंदनच्या सुखरुप परतीची मागणी आणि प्रार्थना केली जात आहे.

विंग कमांडर अभिनंदनच्या सुटकेसाठी प्रार्थना करणाऱ्या सर्व देशवासियांचे अभिनंदनच्या वडिलांनी आभार मानले आहेत. पुढे ते म्हणाले की, "माझ्या मुलाचा व्हिडिओ पाहून मला अभिमान वाटत आहे. माझ्या मुलगा धाडसी सैनिकाप्रमाणे बोलत आहे. मला त्याचा अभिमान आहे. आज संपूर्ण देश त्याच्या सुखरुप सुटकेसाठी प्रार्थना करत आहे." तसंच माझा मुलगा जखमी नसून सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. पाकिस्तानात त्याला कोणताही त्रास होऊ नये आणि तो सुखरुप परत यावा, याची संपूर्ण देश वाट पाहत आहे.

परदेशी मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी काल (27 फेब्रुवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, पाकिस्तानी विमानांनी भारतात प्रवेश केल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत भारताचे देखील एक मिग-21 विमान क्रॅश झाले आणि भारतीय वायुसेनेचा एक पायलट बेपत्ता आहे. तर पाकिस्तानने 2 भारतीय पायलट त्यांच्या ताब्यात असल्याचे म्हटले होते. मात्र पाकचा हा दावा चुकीचा होता. त्यानंतर खुद्द पाकनेच एक भारतीय पायलट ताब्यात असल्याचे सांगितले.

महत्त्वाची टीप: भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित केलेले वृत्त लेटेस्टलीकडे प्राप्त झालेल्या माहितीवर आधारीत आहे. कोणत्याही निष्कर्षावर पोहचण्यापूर्वी किंवा सोशल मीडियावर संदेश प्रसारित करण्यापूर्वी वाचकांनी भारतीय लष्कराकडून अधिकृत माहिती मिळेपर्यंत प्रतिक्षा करावी अशी विनंती.