कोरोना व्हायरसच्या उपचारांसाठी Hydroxychloroquine ची मागणी वाढली; भारत 55 देशांना करणार औषधांचा पुरवठा, जाणून घ्या यादी

संपूर्ण जगात उत्पादित होणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पेईकी एकट्या भारतात 70 टक्के उत्पादन घेतले जा

Hydroxychloroquine (Photo Credits: AFP)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी वापरल्या जाणार्‍या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची (Hydroxychloroquine) मागणी जगभरात वाढत आहे. संपूर्ण जगात उत्पादित होणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पैकी एकट्या भारतात 70 टक्के उत्पादन घेतले जाते. यामुळे सध्या जगातील बहुतेक देश या संकटाच्या वेळी भारताकडे आशेने पहात आहेत. आता अशा देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारत पुढे सरसावला आहे. सध्या भारत, अमेरिका, फ्रांस, रशिया, युकेसह तब्बल 55 देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करीत आहे. भारतात दरमहा 40 टन हायड्रोक्सीक्लोरोक्विन (HCQ उत्पादन करण्याची क्षमता आहे. हे 200 -200 मिलीग्रामच्या जवळजवळ 200 दशलक्ष टॅब्लेट इतके आहे.

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध मलेरिया व्यतिरिक्त संधिवात आणि ल्युपस सारख्या रोगांच्या उपचारांमध्ये वापरले जाते. परंतु अलीकडेच अमेरिका, चीन आणि दक्षिण कोरियासह बर्‍याच देशांमध्ये हे औषध कोरोना विषाणूवर मात करण्यास सक्षम असल्याचे दिसून आले. तेव्हापासून हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची मागणी परदेशात वाढली आहे. यापूर्वी, हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीवर भारताने पूर्णपणे बंदी घातली होती, परंतु नंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केलेल्या मागणीनंतर, भारताने एचसीक्यू औषध अमेरिकेसह अन्य देशांत पाठविणे सुरू केले.

भारताकडून या देशांना होत आहे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा -

अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, रशिया, अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, नेपाळ, मालदीव, श्रीलंका, म्यानमार, सेशेल्स, ओमान, संयुक्त अरब अमिराती, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, डोमिनिकन रिपब्लिक, युगांडा, इजिप्त, आर्मेनिया, सेनेगल, अल्जेरिया, जमैका, उझबेकिस्तान, कझाकस्तान, युक्रेन, नेदरलँड्स, स्लोव्हेनिया, उरुग्वे, इक्वाडोर आणि इतर काही देश

सध्या Ipca Laboratories, Zydus Cadila आणि Wallace Pharmaceuticals देशातील एचसीएसक्यू तयार करणार्‍या मोठ्या औषध कंपन्या आहेत. अलीकडे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने इप्का प्रयोगशाळेला आणि झेडस कॅडिलाला सुमारे 100 दशलक्ष एचसीक्यू टॅब्लेटची ऑर्डर दिली आहे. (हेही वाचा: Nuclear Tests By China?; कोरोना व्हायरसचे संकट कमी होताच चीनने अणुचाचण्या सुरु केल्याचा अमेरिकेचा आरोप)

परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या औषधासाठी 55 देशांकडून आलेल्या अर्जांना तीन टप्प्यात मान्यता देण्यात येईल. पहिल्या दोन टप्प्यांसाठी निवडल्या गेलेल्या देशांना पुरवठा करण्यात आला आहे. दक्षिण आशियातील पाकिस्तान वगळता इतर सर्व देशांनी एचसीक्यूसाठी भारताकडे विचारणा केली आहे व त्यापैकी बहुतेकांना त्याचा पुरवठा केला गेला आहे.