अबब! भारतामध्ये 'या' क्षेत्रातील रोजगारामध्ये झाली 108 टक्क्यांची लक्षणीय वाढ; नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध
तामिळनाडूतील राणीपेट येथील ओलाचा ई-स्कूटर कारखाना पूर्णपणे महिला चालवतात.
इलेक्ट्रिक वाहन (EV) क्षेत्रातील रोजगार गेल्या दोन वर्षांत 108 टक्क्यांनी वाढला आहे. सीआयईएल एचआर सर्व्हिसेसने (CIEL HR Services) शनिवारी केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. रोजगाराच्या बाबतीत ईव्ही क्षेत्रात अभियांत्रिकी विभागाचा दबदबा आहे. त्यानंतर ऑपरेशन्स आणि सेल्स, क्वालिटी अॅश्युरन्स, बिझनेस डेव्हलपमेंट, माहिती तंत्रज्ञान, मानव संसाधन आणि मार्केटिंग यांचा समावेश होतो. त्यामुळे सध्या या क्षेत्रात काम करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असून, इच्छुक तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते.
'ईव्ही सेक्टर 2022 मधील नवीनतम रोजगार ट्रेंड्स' या शीर्षकासह प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात, सीआयईएल एचआर सर्व्हिसेस लिमिटेडने 52 कंपन्यांमधील 15,200 कर्मचाऱ्यांची मत जाणून घेतली. बेंगळुरू 62 टक्क्यांसह इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रतिभेच्या यादीत अव्वल आहे, असे अभ्यासात म्हटले आहे. त्यापाठोपाठ नवी दिल्ली 12, पुणे 9 टक्के, कोईम्बतूर 6 टक्के आणि चेन्नई 3 टक्के आहे.
इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांनी गेल्या सहा महिन्यांत 2,236 कर्मचारी नियुक्त केले आहेत. या विभागातील जवळपास सर्वच क्षेत्रात महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे. कायनेटिक ग्रीन, महिंद्रा इलेक्ट्रिक, कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस, ओबेन इलेक्ट्रिक, अँपिअर व्हेइकल्स यासारख्या काही कंपन्यांमध्ये उच्च व्यवस्थापन पदांवर महिला आहेत. तामिळनाडूतील राणीपेट येथील ओलाचा ई-स्कूटर कारखाना पूर्णपणे महिला चालवतात. (हेही वाचा: कोरोना नंतर 73% भारतीय कंपन्या करत आहे 'हायब्रिड वर्किंग मॉडेल'चा विचार- CBRE सर्वेक्षण)
सीआयईएल एचआर सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आदित्य नारायण मिश्रा म्हणाले, ‘इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्यासाठी भारत वेगाने गुंतवणूक करत आहे. भारताने ही गती कायम ठेवली तर 2030 पर्यंत देशातील ईव्ही क्षेत्रात 206 अब्ज डॉलरच्या संधी उपलब्ध होतील.’