वेतन मिळण्यापूर्वी 'या' गोष्टींची पूर्तता न केल्यास 20 टक्के TDS कापला जाईल
जर एखाद्या कर्मचाऱ्याचा टीडीएस कापण्यापूर्वी त्याने पॅन (PAN Card) किंवा आधार कार्डची (Aadhar Card) माहिती दिली नाही तर त्या व्यक्तीच्या वेतनामधून 20 टक्के कापला जाणार आहे .
टॅक्स डिटक्ट अॅट सोर्स (Tax Deducted at Source) म्हणजेच टीडीएस (TDS) बाबत सरकारने नियमात बदल केले आहेत. बदललेल्या नियमानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याचा टीडीएस कापण्यापूर्वी त्याने पॅन (PAN Card) किंवा आधार कार्डची (Aadhar Card) माहिती दिली नाही तर त्या व्यक्तीच्या वेतनामधून 20 टक्के कापला जाणार आहे . सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) यांची जाहीर केलेल्या एका पत्रकानुसार स्पष्ट करण्यात आले आहे की, नव्या नियमानुसार आधार कार्ड क्रमांक देणे अनिवार्य असणार आहे. यापूर्वी कर कापण्यासाठी पॅन कार्ड क्रमांक देणे आवश्यक होते. मात्र गेल्या वर्षापासून सरकारने सांगितले की, जर एखाद्याकडे पॅन कार्ड नसल्यास तो आधार कार्ड क्रमांक कर कापण्यासाठी देऊ शकतो.
नव्या नियमानुसार जर एकाख्या कर्मचाऱ्याचे वार्षिक वेतन 2.5 लाख रुपये असल्यास त्यांच्याकडून कराची रक्कम वसूल केली जाणार नाही. सध्या 2.5 लाखापर्यंत इनकम टॅक्स फ्री असून 2.5 लाख-5 लाख पर्यंतच्या वेतनावर 5 टक्के कर लावण्यात येतो. सर्व प्रकारच्या सूटचा फायदा घेतल्यानंतर वेतन जर 20 टक्के टॅक्सेबलच्या स्लॅब मध्ये येत असल्यास त्यावर 20 टक्के टीडीएस आकारला जाणार आहे. 5- 10 लाखापर्यतच्या वेतनावर 20 टक्के कराची वसूली करतात.(नवीन वर्षापासून लागू होणार 'हे' 8 नवे नियम; जाणून घ्या काय होणार परिणाम)
तसेच पॅनकार्डला आधार जोडण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. पॅनकार्ड आधारला लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर 2019 ही अंतिम तारीख देण्यात आली होती. परंतु, यासाठी 31 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. यामुळे ज्या नागरिकांनी पॅनकार्ड आधारला जोडले नाही, अशा नागरिकांना आणखी एक संधी मिळणार आहे. आधारला पॅनकार्डशी न जोडणाऱ्या नागरिकांचे पॅन कार्ड रद्द केले जाणार आहे, असे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले होते. यातच सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेजने आधारकार्ड आणि पॅनकार्डला जोडण्याची मुदतीत वाढ करुन नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.